महिला अत्याचाराविरोधात जुन्नरमध्ये मोर्चा

जुन्नर-काश्‍मीर व उत्तर प्रदेश येथील महिला अत्याचारांविरोधात सोमवारी (दि. 16) जुन्नरला काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला. काश्‍मिर कठुआ, उत्तरप्रदेश उन्नाव येथे नुकत्याच झालेल्या महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना तसेच देशात आणि राज्यात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सातत्याने होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांचा निषेध आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज (दि. 16) सकाळी पूर्व वेस जुन्नर ते तहसील कार्यालय येथे जुन्नर शहर व जुन्नर तालुक्‍यातील विविध सामाजिक संघटनांकडून महिला अत्याचाराच्या विरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. तालुक्‍यातील नागरिक या अत्याचाराच्या विरोधात निषेध मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कोणत्याही जातिपातीचा विचार न करता महिला न्यायासाठी एकत्र आल्या असल्याचे उपनगराध्यक्षा अलका फुलपगार यांनी सांगितले.
या मोर्चात मराठी मुस्लिम अस्मिता अधिकार महाराष्ट्र राज्य, इत्तेहाद ए कौमी मुव्हमेंट, युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य, शिवजन्मभूमी युवा फाउंडेशन, जीवनज्योती सेवा फाउंडेशन, हल्लाबोल टीम जुन्नर, हनफिया कादरिया ग्रुप यासह तालुक्‍यातील विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभागी होऊन निषेध नोंदविला असून समस्त जुन्नर तालुक्‍याच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. जुन्नरच्या नायब तहसीलदार आशा दुधे व जुन्नर पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी मोर्चेकऱ्यांच्या वतीने शाळकरी लहान मुलींच्या हस्ते दिलेले निवेदन स्वीकारले असल्याचे रिजवान पटेल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)