महिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळावेत

डॉ. गोऱ्हे : बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प

पुणे – देशात कौटुंबिक हिंसाचार आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पोलिसांनी महिलांविषयक गुन्हे संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत तरच आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ होईल, असे मत आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यशदा येथे महिला व बालकांच्या सुरक्षेसंदर्भात राष्ट्रीय चर्चासत्र झाले. उद्‌घाटन सत्रामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंटचे पोलीस महासंचालक डॉ. ए. पी. माहेश्‍वरी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मध्य प्रदेश पोलीस महासंचालक राजेंद्र कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजी बोडखे, अपर आयुक्त प्रदिप देशपांडे आदी उपस्थित होते.

आ. गोऱ्हे म्हणाल्या, जपानमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण तब्बल 96 टक्‍के आहे. त्या तुलनेत भारतात बलात्कार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यांत शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ 8 ते 10 टक्‍के इतके अत्यल्प आहे. त्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम पोलिसांनी स्वत:ची मानसिकता बदलावी. बलात्काराच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यासह चार ते पाच पोलीस कर्मचारी बसून महिलेची “एफआयआर’ नोंदवून घेतात, ही पद्धत बदलणे गरजेचे आहे. पीडितेची तक्रार नोंदवित असताना तिच्या मनास लज्जा होईल असे शब्द टाळले पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये बलात्कार पीडितेस उपचारासाठी दाखल केले असता तेथे काम करणाऱ्या डॉक्‍टरसह सर्व कर्मचाऱ्यांना माहिती होते. ते तिच्या अवतीभोवती चर्चा करीत असतात. त्यामुळे तिला त्रासास सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा पीडितांसाठी रुग्णालयात वेगळी रूमची व्यवस्था केली पाहिजे.

महिलांविषयक गुन्हे नोंदवून घेण्यासाठी “स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग सिस्टिम’ तयार केली पाहिजे. ज्यामध्ये अल्पवयीन व सज्ञान मुलगी यांची तक्रार घेणे, तसेच “लिव्ह इन रिलेशनशिप’ तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात तक्रार घेण्याची वेगळी पद्धत असली पाहिजे. सध्या “सीसीटीएनएस’ पद्धत उत्तम आहे. तसेच, फॉरेन्सिक लॅबकडूनही चांगले काम होत आहे. मात्र, काही वैद्यकिय चाचण्यांना उशीर होत असल्यामुळे आरोपींना फायदा होत असल्याचे गोऱ्हे यांनी नमूद केले.

दरवर्षी चार लाख मुले होतात बेपत्ता
स्त्री-पुरूष समानता आणि दोघांनाही समान संधी दिल्यासच लोकशाही सदृढ होण्यास मदत होईल. देशात दरवर्षी चार लाख मुले मिसिंग होतात. हा राष्ट्रासमोर एक चिंतेचा विषय आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक ए. पी. माहेश्वरी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)