महिलांवर 3 हजार वर्षांत झाले नाहीत; एवढे अत्याचार मोदींच्या राजवटीत

राहुल गांधी यांचा हल्लाबोल
नवी दिल्ली – देशभरातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. देशात महिलांवर मागील तीन हजार वर्षांत झाले नाहीत; एवढे अत्याचार मोदींच्या राजवटीत झाल्याचा आरोप त्यांनी केला.

बलात्काराच्या काही प्रकरणांत भाजपचे काही नेते आरोपी आहेत. त्याचा संदर्भ देऊन राहुल म्हणाले, बेटी बचाओ, बेटी पढाओ असे अभियान मोदी सरकारने हाती घेतले आहे. खरेतर ते अभियान मुलींना भाजपच्या आमदारांपासून वाचवण्यासाठी आहे. बुलेट ट्रेन, विमाने, स्वच्छतागृहे अशा सगळ्यांच बाबींवर मोदी बोलतात. मात्र, महिला अत्याचाराच्या विरोधात ते एक शब्दही बोलत नाहीत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. राहुल येथील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या महिला अधिकार संमेलनात बोलत होते. कॉंग्रेस संघटनेत 50 टक्के महिलांना प्रतिनिधित्व देण्याचे माझे उद्दिष्ट आहे.

-Ads-

कॉंग्रेस संघटनेत महिलांना अग्रस्थान देऊन राज्याचे किंवा देशाचे नेतृत्व त्यांनी करावे असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा दृष्टीकोन बाळगणार नाही. महिलांना मागचे आणि पुरूषांना पुढचे स्थान अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्यात आणि आमच्यात हाच मोठा फरक आहे. संघ ही केवळ पुरूषांना महत्व देणारी संघटना आहे. संघाने कधीच महिलांना संघटनेत येऊ दिलेले नाही, असे ते म्हणाले.

संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी कॉंग्रेस पूर्ण पाठिंबा देईल. मोदी सरकारने ते विधेयक मंजूर केले नाही तर केंद्रात सत्तेत आल्याबरोबर कॉंग्रेस ते पाऊल उचलेल, अशी ग्वाहीही राहुल यांनी दिली.
मोदी असमर्थ चालक-राहुल

संसद भवनात कॉंग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीत बोलतानाही राहुल यांनी विविध मुद्‌द्‌यांवरून मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर मोदींनी देशाची स्थिती 70 वर्षांत संथगतीने चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनसारखी झाल्याचे म्हटले. आपल्या राजवटीत देशाचे रूपांतर अच्छे दिन आलेल्या मॅजिकल ट्रेनमध्ये होईल, असेही त्यांनी बोलून दाखवले. दुर्दैवाने, मोदींच्या रूपाने असमर्थ चालक मिळाल्याने देशाची स्थिती आपत्तीकडे निघालेल्या ट्रेनसारखी झाली आहे, असे ते म्हणाले.

मोदी सरकारच्या विरोधात देशात संतापाची लाट आहे. त्यांचे सरकार हटवण्यासाठी देशाची जनता कॉंग्रेस आणि मित्रपक्षांकडे आशेने पाहत आहे, असा दावाही त्यांनी केला.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)