महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ साताऱ्यात मुक मोर्चा

शपथ घेतली मानवतेची
मोर्चा समारोप प्रसंगी उपस्थित मोर्चेकऱ्यांनी शपथ घेतली. आम्ही सर्व जण प्रत्येक जाती धर्मातील जातीतील मुलींचे संरक्षण करू. मुली व महिलांवर अत्याचार होणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू. अत्याचाराच्या घटना घडल्यास जाती धर्म बाजूला ठेवून आवाज उठवू, देशातील राष्ट्रसंत व महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करु अशी शपथ घेत अखेरीस सर्वांनी मानवतेचा विजय असो अशी एक आवाजात घोषणा दिली.

सातारा –  काश्‍मिरमधील 8 वर्षीय आसिफा व उत्तरप्रदेशातील 18 वर्षीय अस्मिता यांच्यावर अत्याचार व खूनांच्या घटनांसह देशभरात महिला व अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ गुरूवारी मुकमोर्चा काढण्यात आला. सकाळी 11 वाजता गोलबाग येथील थोरले प्रतापसिंह महाराज पुतळा राजवाडा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा काढण्यात आला. मोर्चा पोहचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेकडरांना अभिवादन केले तसेच वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ सरकारवर कडाडून टीका करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली.

मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना यांच्यावतीने जात, धर्म, पंथ भेद विसरुन मानवतेसाठी आणि न्यायासाठी एकदिलाने मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन केलेल्या मोर्चात साताऱ्यातील विजय मांडके, कॉ.विजय निकम, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, कॉ.वसंत नलवडे, इरफान बागवान, एहमद कागदी, मौलाना कमरुद्दीन तांबोळी, शफीक शेख इस्माइल डांगे, हाजी तोहिद, मनसे शहराध्यक्ष राहुल पवार , सादिक शेख, हेमा सोनी, गणेश भिसे यांच्यासह बहुसंख्यने युवक-युवती नागरिक सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या युवक युवतींच्या हातातील एक मेरी बेटी थी…एक मेरी बहन, नारी सन्मान…देश का सन्मान अशा आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते.

-Ads-

मोर्चा समारोप प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी बोलताना हाजी तोहिद म्हणाले, देशात दिवसेंदिवस महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लोकांनी अशा घटनांविरोधात आवाज उठवायला हवा. आज जर आपण शांत राहण्याची भूमिका घेतली तर अशा घटनांचे प्रकार आपल्या घरापर्यंत येवू शकतील. काश्‍मिरमधील कठुआ व उत्तरप्रदेशमधील अत्याचार व खूनाची घटना घडून देशाचे पंतप्रधान जे स्वत:ला चौकीदार म्हणवतात ते घटनेनंतर 72 तास शांत राहिले. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करून विदेश दौऱ्यावर निघून गेले.आता अत्याचार होण्याच्या घटना रोखण्यासाठी इतका कठोर कायदा केला पाहिजे की अत्याचार करण्याअगोदर तो आरोपी हजार वेळा विचार करेल. सरकारने अत्याचाराच्या घटना रोखण्यात व आरोपींना शिक्षा करण्यात कमी पडले तर आम्ही शांत बसणार नाही.
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत म्हणाले, देशाच्या पंतप्रधानांना विदेशात पर्यटन करायला वेळ आहे, मन की बात करायला वेळ आहे परंतु बलात्काराच्या घटनांवर बोलायला वेळ नाही. आज देशात बलात्काराच्या गुन्ह्याबाबत कायदा कडक आहे परंतु केवळ कायदा कडक असून उपयोग नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. अत्याचाराच्या वाढत्या घटना फार काळ आम्ही सहन करणार नाही. लवकरच साताऱ्यात भारिपच्यावतीने बेटी बचाओ, भाजप हटाओ आंदोलन करणार असल्याचे खंडाईत यांनी जाहीर केले.
विजय मांडके म्हणाले, काश्‍मिर, उत्तरप्रदेश आणि नुकतीच सातारा जिल्ह्यात ही मुलींवर अत्याचाराची घटना घडली. अत्याचारांच्या वाढत्या घटना आता आम्ही सहन करणार नाही. राष्ट्रपतींनी अशा घटनांबाबत सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, केवळ धारेवर धरून उपयोग होणार नसून दोन्ही राज्यात अत्याचारांच्या घटनांचे समर्थन करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करा. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आवाज उठवित आहोत. न्यायालयाने ही अत्याचारांच्या प्रकरणात पक्षपातीपणा न करता न्याय केला पाहिजे, अशी मागणी मांडके यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)