महिलांनी व्यवसायात गुणवत्ता सिद्ध करावी

  • सभापती उषा कानडे ः चांडोली येथे महिला प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

मंचर – महिलांनी “चूल आणि मूल’ यात गुंतून न राहता घराबाहेर पडून वेगवेगळे व्यवसाय करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे यांनी केले.
चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे जिल्हा उद्योग केंद्र मिटकॉन यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता समारंभात पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अरूणा थोरात, पंचायत समिती सदस्या आशा शेंगाळे, भीमाशंकर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक उत्तम थोरात, उपसरपंच सुलोचना सुकाळे, विजय थोरात, दिनेश खेडकर, माजी उपसरपंच संदीप थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्या आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. लोकशाही आघाडीच्या काळात महिला बचत गटांना विविध योजनांद्वारे अनुदान दिले जात होते. सध्या सरकारकडून बचत गटांना म्हणावी तशी मदत मिळत नाही.परंतु महिलांनी विविध प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसायात भरारी घ्यावी. त्यातून आर्थिक संपन्नता साधावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सुचित केल्यानुसार आंबेगाव तालुक्‍यातील लोणी, शिनोली, मंचर, चांडोली बुद्रुक गावच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते प्रकल्प समन्वय दिपा शिंदे व प्रशिक्षक सुमन थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चांडोली बुद्रुक येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांना फॅशन डिझाइन या व्यवसायाचे 45 दिवसांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. रोजगार निर्मिती हा या मागील मुख्य उद्देश असून एकूण 45 महिलांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले असून आणखी एक बॅच सुरू करण्याबाबत महिलांनी मागणी केली आहे. या सर्व प्रशिक्षणार्थी महिलांना लवकरच प्रत्येकी 1500 रूपये मानधन आणि प्रमाणपत्राचे लकवरच वाटप करण्यात येणार आहे.तसेच हे प्रशिक्षण यशस्वी करण्यामध्ये माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती प्रकल्प समन्वयक दिपा शिंदे यांनी दिली. माजी उपसरपंच माऊली थोरात गुरूजी यांनी आभार मानले.तर सूत्रसंचालन अक्षय खरमाळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)