महिलांच्या स्वातंत्र्य आणि आत्मविश्वासाठी गुंतवणूक

पैशाला सध्याच्या जगात महत्व आलेले आहे, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाने जगणे, हे पैशांवरच अवलंबून आहे. पण पुरेसा पैसा आयुष्यभर मिळत राहील,यासाठी नियोजन आणि गुंतवणूक करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे महिलांनी मागे न राहता पैशांची ही भाषा समजून घेतली पाहिजे.

माणसाच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्रय अतिशय महत्त्वाचे असते. भारतीय समाजात आणि कुटुंबात सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रीला आजही दुय्यम स्थान असल्याने अशा स्त्रियांसाठी आर्थिक स्वातंत्रय महत्त्वाचे ठरते. आर्थिक स्वातंत्र्यातूनच मानसिक, भावनिक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा दरवाजा उघडतो. स्त्रीने स्वतः कष्टाने पैसा मिळवणे आणि त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यातून तिला नवा आत्मविश्वास प्राप्त होतो.

प्रत्येक व्यक्ती आर्थिकदृष्ट्‌या स्वतंत्र असणे महत्त्वाचे असते. आर्थिक स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या चरितार्थासाठी मेहनत करून पैसा मिळवणे आणि तो कसा खर्च करायचा, किती व कुठे बचत करायची आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचा अधिकार प्राप्त होणे म्हणजे आर्थिक स्वावलंबन. ही गोष्ट स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखीच लागू होते. मात्र अनेकदा स्त्रीला याबाबत तडजोड करावी लागते. मातृत्वाच्या वेळी तिला करिअरमधून ब्रेक घ्यावा लागतो. काही घरगुती अडचणी/समस्या निर्माण झाल्या तर त्यावर उपाययोजना म्हणून तिला करिअरला ब्रेक लावला जातो. अशा अनेक कारणांमुळे तिचे करिअर, प्रगती, कमाई या सगळ्यांमध्ये खंड पडतो. त्यामुळेच स्त्रीने आयुष्यातील हे सगळे टप्पे लक्षात घेऊन आर्थिक स्वावलंबनासाठीचे नियोजन आधीपासून केले पाहिजे.

पैशाच्या व्यवस्थापनाबाबतचा आत्मविश्वास –

आज स्त्री करिअर करत असली, पैसा कमावत असली तरी त्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत ती पूर्णतः पतीवर किंवा कुटुंबातील पुरूष सदस्यावर अवलंबून असते. त्याचे एक कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव. खरे तर एकदा का स्त्रीने स्वतःच्या कष्टाच्या पैशाच्या व्यवस्थापनाची सूत्रे हाती घेतली की, चमत्कार घडू लागतात. तिच्यामध्ये आत्मविश्वास येऊ लागतो. केवळ माहितीचा अभाव असल्याने ती चाचपडत असते. सध्याच्या माहितीच्या स्फोटाच्या युगात विविध स्वरुपाची माहिती मिळणे फारसे अवघड नसते. भारतीय स्त्री मुळातच चोखंदळ असल्याने ती चार ठिकाणी चौकशी करून वाचून, अभ्यास करून, माहिती घेऊन मगच गुंतवणुकीचा विचार करत असल्याने ती हळूहळू या कामात चांगलीच वाकबगार होऊन जाते. बचतीची आणि गुंतवणुकीच्या विविध साधनांचा ती विचार करू लागते. त्याबाबत मैत्रिणींकडे चौकशी करते. इंटरनेटवर सर्च करते. अर्थात सुरवातीला हे सगळे जमेल की नाही असे वाटू लागते पण कालांतराने पैशाला पैसा जोडला जाऊ लागतो तेव्हा ती मनोमन सुखावते.

तातडीच्या प्रसंगासाठी निधी :

पाऊस येण्याआधी पावसाळ्याची तयारी करावी लागते. स्वतःच्या आर्थिक सुरक्षेसाठी तातडीच्या प्रसंगात लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे. मग ती एखाद्या बॅंक खात्यात असेल किंवा शेअरमध्ये. अगदी म्युच्युअल फंडातील लिक्विड फंडात देखील ठेवता येऊ शकते. त्यातून दीर्घकाळात रास्त परतावा देखील मिळत राहतो. याबरोबरच स्त्री विवाहित असो किंवा एकटी. प्रत्येकीने निवृत्तीचा विचार करून त्यासाठी बचत आणि गुंतवणूक दरमहा करत राहणे आवश्‍यक असते. ही सगळी आर्थिक उद्दीष्टे गाठण्यासाठी गुंतवणुकीची योग्य साधने कोणती व ती कशी वापरायची याची माहिती तज्ञांकडून मिळू शकते.

बचतीचे अंदाजपत्रक:

किमान आता येत्या महिन्यात काय मोठा खर्च आहे याची आपण मनातल्या मनात उजळणी केलेली असते. त्याऐवजी आता दरमहा बचतीचे अंदाजपत्रक करायला सुरवात करा. अगदी कागद आणि पेन घेऊन या महिन्यात किती बचत झाली पाहिजे याचा विचार करा. तुमच्या प्राप्तीच्या किमान वीस ते पंचवीस टक्के रकमेची बचत झाली पाहिजे अशा पद्धतीने बचतीचे अंदाजपत्रक लिहून काढा. अर्थात त्यामध्ये खर्चापेक्षा बचतीला प्राधान्य असेल. त्यामुळे आधी बचतीचा कॉलममध्ये आकडे लिहून उरलेली रकमेत महिनाभराचे नियोजन कसे करायचे हे ठरवा. यामध्ये कर्जाचे हप्ते, दर महिन्याचा खर्च असे अनेक अडथळे येऊ शकतात. मात्र बचतीच्या अंदाजपत्रकाला धक्का लावायचा नाही असा एकदा निर्धार केला की, भविष्यात पैशातून जोडल्या गेलेल्या पैशाची एकूण बेरीज पाहिल्यावर नक्कीच समाधान वाटते. यासाठी दीर्घकाळ पीएफ आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची उदाहरणे पहा.

आर्थिक सल्लागाराची मदत घ्या –

चांगला आर्थिक सल्लागार तुम्हाला सर्वसमावेशक आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवून देऊ शकतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना आर्थिक सल्लागाराची मदत घेणे सोपे वाटते. अर्थात आर्थिक सल्लागार अतिशय काळजीपूर्वक निवडावा. ऑफिसमधील ओळखीची व्यक्ती किंवा शेअरबाजारात पैसे मिळून देतो म्हणून पुढे येणारे, जास्त व्याजाचे अमिष दाखवणारे यांच्यापासून लांब रहावे. मोफत सल्ला देणाऱ्या आर्थिक सल्लागारापासून दूर राहणे श्रेयस्कर. या जगात मोफत काही मिळत नसते. त्यामुळे आर्थिक सल्लागाराची रास्त फी देऊन त्याच्याकडून सेवा घेणे श्रेयस्कर. अऩेकदा विमा एजंट आर्थिक सल्लागार म्हणून पुढे येतात. लक्षात घ्या कधीही विमा ही बचत किंवा गुंतवणूक नसते. विमा नेहमीच संरक्षणासाठी असतो आणि त्यामुळेच फक्त शुद्ध विमा (टर्म इन्शुरन्स) घ्यावा.

मागे हटू नका :

आर्थिक स्वातंत्रय हे सध्याच्या काळात गरज बनले आहे. अनेकदा आपल्याला असुरक्षित, चिंताग्रस्त वाटू लागते, ते आर्थिक स्वातंत्रय नसल्यामुळे. काहीवेळा काळजी घेऊन, योग्य आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनदेखील गुंतवलेली रक्कम कमी होऊ शकते. अर्थात हे सगळे बाह्य परिस्थितीवर अवलंबून असते. अनेकदा कुटुंबातील पुरुषांनी तरी मोठे नुकसान सोसलेले असते. अर्थात त्यांच्या मानसिकतेमुळे त्यांनी ही बाब उघड न करता वेळ मारून नेलेली असते. त्यामुळे स्त्रीने पैशाचे व्यवस्थापन करताना कधी चुका झाल्या किंवा व्यवस्थापनात त्रुटी राहिल्या तरी गोंधळून जाऊन माघार घेण्याचा विचार करू नये. या अनुभवातून योग्य ते शहाणपण घेऊन अधिक सजगतेने गुंतवणूक करत राहणे आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचे ठरते.

-चतुर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)