महिलांचे प्रश्‍न प्राधान्याने सोडविण्यात येतील – विश्‍वासराव देवकाते

जिल्हा परिषदेत “हिरकणी कक्षा’चे उद्‌घाटन

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 16 – महिलांसाठी अगोदरच “हिरकणी कक्ष’ सुरू होणे आवश्‍यक होते. परंतू, आज या हिरकणी कक्षाचे उद्‌घाटन होत असून, त्याचा फायदा जास्तीत जास्त महिलांना होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या महिला तसेच कर्मचारी महिला यांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी दिले.

जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या महिलांच्या सोयी-सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या “हिरकणी कक्षा’चे बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या नविन प्रशासकिय इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील प्रतिक्षा कक्षामध्ये हा हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये वीज, पंखा, सोफा, खुर्ची अशा विविध सुविधा या कक्षामध्ये देण्यात आल्या आहेत. एका वेळी सहा महिला या कक्षामध्ये बसू शकतात. हिरकणी कक्षामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांना मदत होणार असून, सर्वच विभागांनी लहान मुलांसोबत असलेल्या महिलांचे काम तात्काळ करून देऊन सहकार्य करावे. महिलांना काही अडचणी असल्यास वरिष्ठाच्या लक्षात आणून द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी केले.

दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र, या महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र अशी कोणतीही व्यवस्था नव्हती. काही दिवसांपूर्वी एक महिला आपल्या मुलाला इमारतीच्या पायरीवर बसून स्तनपान करत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी सुरज मांढरे यांच्या निदर्शनात आले. त्यानंतर त्यांनी त्वरीत महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अवघ्या दहा दिवसांत या कक्षाचे काम पूर्ण करुन कक्षाचे उद्‌घाटन केल्यामुळे सर्व स्थरातून जिल्हा परिषदेचे कौतुक होत आहे. सभापती राणी शेळके यांनी प्रास्ताविक केले. तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)