महिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल

राज्यसरकार करते काय?  
मुंबई – राज्यातील दुर्गम भागातील मुलांचा कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूला आळा घालण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मेळघाटात गेल्या सप्टेबर महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 72 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आज न्यायालयात दिली. याची न्या. अभय ओक आणि न्या. एम.एस. सोनाक यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत सरकार करते काय ? असा संतप्त सवाल केला.

मेळघाटसह राज्यातील अन्य आदिवासी भागांत कुपोषणामुळे मृत्यू व आजाराचे प्रमाण वाढल्याच्या गंभीर वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणाऱ्या विविध जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्या याचिकेवर सुनावणी झाली. राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांत कुपोषणाची समस्या अतिशय गंभीर असून दरवर्षी मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. कुपोषणाचे मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. गेल्या सपटेबर महिन्यात 72 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादाय माहिती यावेळी याचिकाकर्ते बंडू साने यांनी न्यायालयाला दिली. सरकार कुपोषण रोखण्यास अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला. यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला.

कुपोषण रोखण्यासाठी सरकार नेमके काय करते असा सवाल करून कुपोषणासंदर्भात घरोघरी जाऊन काम होते का अशी विचारणाही राज्य सरकारकडे केली.यावेळी या संदर्भात तयार करण्यात आलेल्या कोर कमिटी समस्येच्या मूळाशी जाऊन काम करत असल्याचा दावा राज्य सरकारने केला. याची दखलही न्यायालयाने घेतली. तुम्ही गेल्या दोन महिन्यात काय काम केले, याचा पुढील सुनावणीच्यावेळी अहवाल सादर करा. असे निर्देश न्यायालयाने दिले आणि याचिकेची सुनावणी दोन आठवडे तहकूब ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)