महिनाभरात तुकाई चारी योजनेला मंजुरी मिळणार

कर्जत तालुक्‍यात फटाके फोडून जल्लोष…

आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत तुकाई चारीचा प्रश्‍न सुटल्याचे वृत्त समजताच तालुक्‍यात फटाके फोडून व पेढे वाटून शेतकऱ्यांनी जल्लोष केला. कर्जत शहरात भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष केला.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची मुंबईत घोषणा : पालकमंत्री प्रा. राम शिंदेंच्या प्रयत्नाला यश

कर्जत तालुक्‍यातील 21 गावांतील पाणीप्रश्‍न सुटणार

कर्जत – आज जागतिक जलदिनाच्या दिवशी कर्जत तालुक्‍यातील जनतेला पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून अनोखी भेट मिळाली. प्रा. शिंदे यांच्या प्रयत्नांतून आज मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या शिवनेरी निवासस्थानी बैठक झाली. त्यात कर्जत तालुक्‍यातील तुकाई चारी पाणी योजनेचा प्रश्‍न सुटला आहे. या योजनेसाठी शंभर द.ल.घ.फू. एवढे हक्काचे पाणी आज मंजूर करण्यात आले. महिनाभरात योजनेस प्रशासकीय मान्यता देण्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली.

कर्जत तालुक्‍यातील गुरव पिंपरी, मिरजगाव, डिकसळ, चिंचोली, बहिरोबावाडी यासह 21 गावांतील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या तुकाई चारी पाणी योजनेसाठी मुंबई येथे होणाऱ्या बैठकीकडे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आज सकाळी 9 वा. जलसंधारणमंत्री, पालकमंत्री, कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी यांची बैठक झाली. यावेळी तुकाई चारीस पाणी उपलब्ध करून देण्यात आले. याशिवाय चोंडी, दिघी, जवळा व पाटेवाडी या गावांतील बंधाऱ्यांमध्ये कुकडीचे नियमित 0.075 द.ल.घ.फू. पाणी सोडण्याचा निर्णय झाला. याचप्रमाणे निमगाव गांगर्डा येथील सीना धरणात 0.225 द.ल.घ.फू. इतके पाणी नियमित सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. याशिवाय बिटकेवाडीसाठी देखील कुकडीचे 0.007 द.ल.घ.फू. इतके पाणी सोडण्याचा निर्णय झाला. या निर्णयानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून व पालकमंत्री राम शिंदे यांच्या नावाच्या घोषणा देऊन जल्लोष केला.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, “”आज जागतिक जलदिन आहे आणि माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी मला आज जलनियोजन करण्याची संधी मिळाली. तुकाई चारी योजना ही मृगजळ वाटत होते. पण, आज या योजनेचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तुकाई चारीसाठी “ओव्हर फ्लो’ पाण्याची मागणी असताना मी नियमित पाण्याची उपलब्धता केली आहे. हा प्रश्‍न सोडण्यासाठी मी आमदार असल्यापासून प्रयत्न करीत आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. कुकडी प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून यासाठी 4 हजार 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्‍यातील कुकडी प्रकल्पाची सर्व अपूर्ण कामेदेखील पूर्ण होतील.”तालुक्‍याचे वयोवृध्द सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सूर्यवंशी यांचे या प्रश्नावर मागील एक वर्षापासून सुरू असलेले आंदोलन आता संपेल. यामुळे मला खूप आनंद होत आहे. सूर्यवंशी यांनी अतिशय तळमळीने या प्रश्नासाठी आंदोलन केले आणि त्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली. या योजनेस पुढील एक महिन्यात प्रशासकीय मान्यता घेऊन माझ्याच जलसंधारण विभागामार्फत तुकाई चारीचे काम पूर्ण करू. याशिवाय चोंडी, दिघी, जवळा, पाटेवाडी, सीना धरण व बिटकेवाडी या गावांसाठी हक्काचे कुकडीचे पाणी त्यांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, मुंबई येथील बैठक फार्स नाही. तालुक्‍यातील शेतकऱ्यांची स्वप्न आज प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. या सर्व गावांचा नियमित पाण्यामध्ये समावेश झाला ही खूप आनंदाची बाब आहे. अशोक खेडकर म्हणाले, “”आज तुकाई चारीचा प्रश्‍न सुटला आहे. यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे. माझ्या गावाचादेखील समावेश होत आहे. हा प्रश्न सोडवून प्रा. राम शिंदे यांनी आपला शब्द पाळला व विरोधकांची तोंडे आता गप्प बसतील. राज्यामध्ये 15 वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार होते. परंतु, त्यांना काहीही करता आले नाही. मात्र, प्रा. राम शिंदे यांनी अतिशय अवघड असलेली ही योजना आज साकार केली आहे.

यावेळी संपत बावडकर यांनी प्रा. राम शिंदे यांनी न मागणी करता सीना धरणात नियमित पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे सांगितले. यावेळी संपत बावडकर, रघुनाथ काळदाते, बाबासाहेब गांगर्डे, बाळासाहेब सपकाळ, टकले, शांतीलाल कोपनर, प्रशांत बुध्दीवंत, अनिल बिटके यांची भाषणे झाली. युवराज शेळके यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)