महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली 

कोलंबो: प्रचंड वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर महिंदा राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. श्रीलंकेचे अध्यक्ष सीरिसेना यांनी रानील विक्रमसिंघे यांचे सरकार बरखास्त करून त्यांच्या जागी राजपक्षे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले होते. पण बहुमत आपल्याच मागे आहे असा दावा रानील विक्रमसिंघे यांनी केला होता व संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून बहुमताची चाचणी घेण्याची मागणी त्यांनी केली होती. पण अध्यक्षांनी श्रीलंकेची संसदच 16 नोव्हेंबर पर्यंत बरखास्त केली त्यामुळे राजपक्षे यांना पंतप्रधानपदाची सूत्रे घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

अध्यक्ष सीरिसेना यांनी गेल्या शुक्रवारी विक्रमसिंघे यांचे सरकार अचानक बरखास्त केले होते. त्यामुळे त्या देशात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. तथापी नवीन वादंगाच्या पार्श्‍वभूमीवर नवनियुक्त पंतप्रधानांना सूत्रे हाती घेता आली नव्हती. त्यातच श्रीलंका संसदेचे सभापती कारू जयसुर्या यांनी पदच्युत पंतप्रधान विक्रमसिंघे यांनाच पंतप्रधान म्हणून मान्यता दिल्यानंतर हा राजकीय पेच आणखीनच गडद झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पदच्युत पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपले सरकारी निवासस्थान मात्र अजून रिकामे केलेले नाही. तेथे ते आपल्या समर्थकांसह डेरा देऊन थांबले आहेत. श्रीलंकेत नेमके कोणाकडे बहुमत आहे याचे चित्र संसदेतील मतदानाद्वारेच स्पष्ट होणार आहे. ही प्रक्रिया 16 नोव्हंबर नंतर संसदेचे निलंबन मागे घेतल्यानंतरच पुर्ण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)