महाविद्यालयीन निवडणुकांच्या निर्णयाने प्राचार्यांना चिंता

– व्यंकटेश भोळा 

पुणे – शैक्षणिकदृष्ट्या बहुचर्चित असलेल्या विद्यार्थी निवडणुका आता प्रत्यक्षात पुढच्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहेत. राज्यातील महाविद्यालयांत पुन्हा खुल्या मतदानातून निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थी संघटना पुन्हा महाविद्यालयात सक्रीय होतील. मात्र शैक्षणिक संस्था व प्राचार्यांमध्ये निवडणुकांवरून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाने हा निर्णय लागू केला असला, तरी त्यातून शैक्षणिक वातावरण गढूळ होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. एकूणच विद्यार्थी निवडणुका घेण्याचे शैक्षणिक संस्थांपुढे मोठे आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शासनाने नवीन विद्यापीठ कायदा लागू केला. त्यात महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेण्याची तरतूद केली. त्यानुसार शैक्षणिक संस्थांना आता महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका घेणे अनिवार्य झाले आहे. मात्र त्याबाबतची रूपरेषा अद्याप स्पष्ट न केल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे महाविद्यालयांच्या प्राचार्यांना यंदाच्या वर्षी निवडणुकातून सुटका मिळाल्याचा आंनद होता. मात्र, आता त्याचे परिनियम दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केल्याने आता त्यानुसार विद्यार्थी निवडणुका घेणे शैक्षणिक संस्थांना अटळ आहे.

सुमारे 22 वर्षांपूर्वी महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुका होत होती. यातून विद्यार्थ्यामध्ये गट-तट, मारामारी, खुनापर्यंत घटना घडल्या आहेत. त्यातून शैक्षणिक वातावरण पूरक होण्याऐवजी त्याचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे विद्यार्थी निवडणुका घेण्यावर बंदी घालण्यात आली. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाऊ लागली. मात्र विद्यार्थी निवडणुकांतून नेतृत्व करणारे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘लिंगडोह कमिटीचा आधार घेत विद्यार्थी निवडणुकांचा आग्रह धरला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत.

आता महाविद्यालयात होणाऱ्या विद्यार्थी निवडणुकीत मेळावे किंवा मिरवणूक काढता येणार नाहीत. परीक्षा प्रक्रियेत किंवा कोणत्याही अपराधासाठी दोषी ठरविलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही. उमेदवारांनी पॅनल तयार करू नये. उमेदवाराने धर्म, जात, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे किंवा संघटनेचे चिन्ह, बोधचिन्ह वापरण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांच्या गटांमधील मतभेद विकोपास जातील किंवा परस्पर द्वेष, शत्रुत्व आणि तणाव निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. एकूणच विद्यार्थी निवडणुकांविषयी विद्यार्थ्यांची पात्रता, नियमावली आणि आचारसंहिता स्पष्ट करण्यात आली आहे.

विद्यापीठ व महाविद्यालयाच्या अधिकार मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने विद्यार्थी निवडणुकांचे समर्थन केले जात आहे. त्याचा नकळतपणे महाविद्यालयाच्या कामकाजावर परिणाम होणार, हे मात्र निश्‍चित आहे. शैक्षणिक कामकाजा व्यतिरिक्‍त विद्यार्थी निवडणुकांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे कोणतेही गैरकृत्य न होता निवडणुका घेण्याचे आव्हान प्राचार्यांपुढे राहणार आहेत. या सर्वांच्या समन्वयातून मार्ग काढत निवडणुका घेण्यासाठी शैक्षणिक प्रमुखांना मोठी कसरत करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)