महावितरण म्हणते राज्यात पुरेसे मीटर

नगरमध्ये मात्र तुटवडा; दोन दोन वर्षे तक्रारी प्रलंबित

नगर – महावितरणच्या मुंबई येथील मुख्यालयातून राज्यात कोठेही मीटरचा तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी नगरमध्ये मात्र पुरेसे मीटर नसल्याने घरगुती तसेच कृषिपंपाचे मीटर बदलून मिळत नाहीत. कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांच्या हवाल्याने दोन दिवसांपूर्वीच तशी वृत्ते आली आहेत.
नगर जिल्ह्यातील महावितरणच्या ग्राहकांना गेल्या दोन वर्षांपासून मीटर बदलून मिळत नाहीत. वारंवार तक्रारी करूनही सरासरी बिले दिली जातात. नादुरुस्त मीटर दुरुस्त करून दिले जात नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही मीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. या पार्श्‍वभूमीवर महावितरणच्या मुंबई मुख्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मात्र राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी नवे वीजमीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कुठेही मीटरचा तुटवडा नाही, असे स्पष्ट करण्यात आले. वीज मीटरचा तुटवडा जाणवू नये, म्हणून महावितरणने आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत, असे त्यात म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांत केंद्र शासन पुरस्कृत सौभाग्य योजना तसेच दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या. तसेच संपूर्ण राज्यात जुनी “इलेक्‍ट्रो-मेकॅनिकल’ मीटर व नादुरुस्त मीटर बदलविण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात मीटरचा तुटवडा जाणवला होता; परंतु आता राज्यात कुठेही मीटरचा तुटवडा नाही, असे महावितरणने म्हटले आहे.
महावितरणच्या विविध कार्यालयांत सिंगल फेजचे सध्या सुमारे 2 लाख 31 हजार तर थ्रीफेजचे सुमारे 1 लाख 63 हजार नवीन मीटर उपलब्ध आहेत. याशिवाय महावितरणने 30 लाख नवीन सिंगलफेज वीजमीटरची खरेदी केली असून पहिल्या टप्प्यात त्यातील 89 हजार नवीन मीटर ऑगस्ट महिन्यांत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात सुमारे 2 लाख 60 हजार मीटर उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील प्रत्येक महिन्यात सुमारे 3 लाख 80 हजार नवीन वीजमीटर ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. 2019 च्या मे महिन्यापर्यंत हे 30 लाख मीटर महावितरणला मिळणार आहेत. भविष्यात महावितरणच्या वीजग्राहकांना नवीन मीटरची टंचाई जाणवू नये, म्हणून आणखी 20 लाख मीटर नव्याने घेण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)