महावितरण कार्यालयांमध्ये लागणार थकबाकीदारांची यादी

तातडीने अंमलबजावणीच्या व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या सूचना

पुणे – कोट्यवधींची थकबाकी असणाऱ्या राज्यभरातील ग्राहकांची यादी महावितरण शाखा आणि उपविभागीय कार्यालयात लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही परिमंडलांना दिल्या आहेत.

महावितरण प्रशासनाने राज्यभरातील वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे वीजयंत्रणेचे सक्षमीकरण, उपकेंद्रांची आणि ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविणे यासह अन्य कामांसाठी प्रशासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे प्रशासनावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, त्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

परिणामी हा ताळमेळ बसविण्यासाठी प्रशासनाला आणखी कर्जाऊ रक्‍कम घ्यावी लागत आहे. मात्र, हे वास्तव असतानाच महसूल वसुलीसाठी प्रशासनाला अपेक्षित यश आले नाही. त्यासाठी विविध मोहिम आणि योजना राबवित आल्या. परंतु, थकबाकीचा टक्‍का कमी करण्यास यश आले नाही. त्याबाबत मुख्य कार्यालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार ग्राहकांची यादी महावितरण शाखा आणि उपविभागीय कार्यालयात दर्शनी भागात लावण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत.

अधिकाऱ्यांना तंबी, कारणे नकोत
परिमंडलांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधत असतात. त्यावेळी अधिकारी वीजमीटर उपलब्ध नसल्याने आणि काही मीटर नादूरुस्त असल्याने थकबाकी वसूल होत नाही अशी कारणे देत होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाच्या वतीने नवे मीटर मागविण्यात आले असून ते सर्व कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे असली कारणे खपवून घेणार नसल्याची तंबी संजीव कुमार यांनी दिली आहे.

असे होणार महसूल वसुलीसाठी प्रयत्न
मार्च महिन्यात साडेपाच हजार कोटींचे टार्गेट
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करणार
वसुली न झाल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
त्या त्या महिन्याची वसुली त्याच महिन्यात करणार
ग्रामीण भागांत बील भरण्यासाठी आठवडे बाजारात स्टॉल उभारणार
थकबाकी भरण्यासाठी महावितरण करणार जनजागृती
थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविणार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)