महावितरणच्या संपामुळे अनेक गावे अंधारात

तहसीलदारांना दिले निवेदन : कर्मचाऱ्यांनी दिल्या घोषणा

भोर- महावितरण कंपनीने ग्राहकांना शाखा कार्यालयातून देण्यात येणाऱ्या सेवा कार्यपद्धतीत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून या धोरणाचा कायमस्वरुपी फटका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे याचा विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि. 7) संप केला. तसेच राजवाडा चौकात सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक गावे अंधारात राहिली.
आंदोलनात भोरचे वीज वितरणचे उपविभागीय अभियंता संतोष चव्हाण, ग्रामीणचे शाखा अभियंता राजेंद्र इंगळे, लेखाधिकारी प्रविण राऊत, प्रधान तंत्रज्ञ अशोक कुऱ्हाडे, गणेश बुदगुडे, शाम देशमुख, गणेश आवाळे, माणसिंग नेवसे, किरण बंडे, नागेश बांदल, शिवाजी मोहिते यांच्या सह महावितरणचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एकीकडे वीज ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दूसरीकडे पुणे परिमंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या 25 टक्‍कांनी कमी केली आहे. एका वीज तंत्रज्ञाला 22-25 गावांना सेवा द्यावी लागत आहे. महावितरणच्या वतीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत नाही. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांची भरती करावी. वीज कर्मचारी, कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने तहसीलदार अजीत पाटील, आमदार संग्राम थोपटे, भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार यांना निवेदन देण्यात आले आहे.

  • संपामुळे अनेक गावे अंधारात
    महावितरणच्या धोरणा विरोधात भोर तालुक्‍याच्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला असून याचा फटका पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना बसला आहे. नसरापूर ते वेल्ह्यापर्यंतची गावे अंधारात बुडाली असून शेतकऱ्यांचे शेती पंप बंद पडले आहेत. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी भोर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती लहू शेलार यांनी केली आहे.
  • संपामुळे वीज ग्राहकांची 7 ते 9 जानेवारी या काळात गैरसोय होणार नाही, याची दक्षता आम्ही घेतली आहे. आमचे म्हणणे शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती तहसीलदारांना केली आहे.
    संतोष चव्हाण, उपविभागीय अभियंता

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)