महावितरणच्या जनमित्रावर निलंबनाची कारवाई

संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
– पुरेसे साहित्य उपलब्ध असतांनाही सोसायटीकडे केली मागणी
पुणे (प्रतिनिधी) – पुणे परिमंडलात वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पुरेसे साहित्य उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्तीसाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य ग्राहकांनी आणून देण्याची गरज नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सदाशिव पेठेतील नीलसदन या सोसायटीला वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणी संबंधित जनमित्रास गुरुवारी निलंबित करण्यात आले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे परिमंडलातील मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरु आहे. पावसाळी परिस्थितीमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्‍यक व पुरेसे साहित्य सर्व मंडल व विभाग कार्यालयांकडे उपलब्ध आहेत. याशिवाय आपत्कालिन परिस्थितीत आवश्‍यक दुरुस्तीच्या कामांसाठी कंत्राट देण्यात आले असून कंत्राटदारांना टर्न-की बेसीसवर (आवश्‍यक साहित्याच्या पुरवठ्यासह) देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आलेले आहे. मुख्य कार्यालयाकडून आवश्‍यक असलेले साहित्य उपलब्ध होत असून परिमंडल, मंडल व विभाग कार्यालयांना आवश्‍यक सुरक्षा साधने तसेच तांत्रिक साहित्य खरेदीचेही अधिकार आहेत. वीज वितरण यंत्रणेची तांत्रिक दुरुस्ती व देखभाल तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी सर्व साहित्यांचा महावितरणकडून पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांवर वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी कोणतीही आर्थिक जबाबदारी नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नीलसदन या सोसायटीला वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणी संबंधित जनमित्रास निलंबित करण्यात आले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महावितरणकडून या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी गुरूवारी नीलसदन सोसायटीमध्ये जाऊन मेजर जनरल (सेवानिवृत्त) एस.सी.एन. जठार यांची भेट घेतली व दुरुस्तीसाठी साहित्य मागितल्याप्रकरणाची माहिती घेतली.
खोदाईत वीजवाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडीत
पुणे – जेसीबीने सुरु असलेल्या खोदकामात महावितरणची 22 केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने गुरुवारी बंडगार्डन परिसरातील सुमारे चार हजार ग्राहकांचा वीजपुरवठा दुपारी 12.41 वाजता खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू होते.
नायडू हॉस्पीटलच्या मागील बाजूस असलेल्या स्मशानभूमीजवळ हॉटेल शेरेटनच्या ड्रेनेज पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यासाठी खासगी कंत्राटदाराकडून जेसीबीने खोदकाम सुरु होते. यात महावितरणच्या नायडू उपकेंद्गाला वीजपुरवठा करणारी 22 केव्हीची एक वीजवाहिनी दुपारी 12.41 वाजता तुटली आणि ढोले पाटील रोड, बोट क्‍लब, बंडगार्डन रोड, गुगल लेन, माणिकचंद आयकॉन, लडकतवाडी परिसरातील सुमारे 4 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. नायडू उपकेंद्रातून भारव्यवस्थापन शक्‍य नसल्याने पर्यायी व्यवस्थेतून या परिसराला वीजपुरवठा उपलब्ध करून देणे शक्‍य झाले नाही. तुटलेल्या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरु करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)