पिंपरी – महावितरण कंपनीच्या दैनंदिन कामकाजादरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये यावर्षी घट झाली आहे. महावितरणच्या वतीने नुकत्याच साजऱ्या केल्या गेलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहांतर्गत ही बाब उघड झाली आहे. वारंवार वीज अपघात होणारी ठिकाणे शोधून या अपघातांचे प्रमाण आणखी कमी करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्या आहेत.
महावितरणच्या दैनंदिन कामकाजात वीज प्रवाह सुरु असताना अनेक अपघात घडतात. काही किरकोळ असतात, तर काही प्राणांतिक असल्याने कर्मचारी अथवा नागरिकांना जीव गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन महावितरणच्या वतीने 11 ते 17 जानेवारीदरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये वीज उपकरणाची देखभाल व दुरुस्ती, ती हाताळण्याची योग्य पद्धत, आणीबाणीप्रसंगी करावयाच्या उपाययोजना याची माहिती दिली जाते.
गेल्या 2015-16 या वर्षात 1600 अपघात घडले होते. तर 2016-17 या वर्षात ही संख्या घटून 1269 एवढी झाली आहे. अपघातांची संख्या शुन्यावर आणण्याचे महावितरण कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. महावितरणचे वीजेशी संबंधित अपघाताचा तपास विद्युत निरिक्षकामार्फत केला जातो. याशिवाय विद्युत निरिक्षणालयाच्या बळकटीकरणाचे का राज्य सरकारने हाती घेतले असून, याकरिता विद्युत कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
अपघाती ठिकाणे शोधण्यासाठी मोहीम
राज्यात वारंवार होणाऱ्या वीज अपघातांच्या विधि ठिकाणच्या अपघातांची माहिती संकलित केली जाणार आहे. अशी ठिकाणे शोधून काढण्यासाठी महावितरणच्या वतीने संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे. त्यानंतर त्यावर उपाययोजना करण्याचे महावितरणचे नियोजन आहे. या मोहिमेमुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असा दावा महावितरणने केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा