महावितरणचे कर्मचारी सोमवारी संपावर

पिंपरी – महावितरण कंपनीतील अनेक अनेक पदे रिक्त असताना कंपनीच्या पुनर्रचनेची राज्य सरकारने भुमिका घेतली आहे. मंजूर पदे भरलेली नसताना आहे. त्या पदांमध्ये कपात केली जात आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात व इतर अनेक मागण्यांसाठी सहा संघटनांच्या वतीने सोमवारी (दि. 7) लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामध्ये पिंपरी, भोसरी व आकुर्डी महावितरण कार्यालयांतर्गत कार्यरत असणारे कर्मचारीही सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना खंडित वीज पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

पिंपरी, भोसरी व आकुर्डी महावितरण कार्यालय गणेशखिंड शहर मंडळाच्या अंतर्गत येत आहे. यामध्ये सुमारे दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यामधील मंजूर पदांपैकी 700 पदे कमी केली जाणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित होण्याची सर्वाधिक शक्‍यता आहे. व्यवस्थापनाच्या या अन्यायकारक धोरणाविरोधात महावितरण कर्मचारी आणि अभियंते गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांना वीज कंपनीने दिलेले मोबाईल बंद करून पुनर्रचना धोरणाचा गेले काही दिवस विरोध सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित होणे आणि फोन बंद असल्याने वीज ग्राहकांना संपर्क साधायला अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणीत वाढ झाली असून आंदोलनाने सर्वजण हैराण झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरणचा सध्या शाखा, उपविभागीय कार्यालये अशा रीतीने सुरु असलेल्या कारभारावर व्यवस्थापनाने री ओढायचे ठरविले असून शाखा कार्यालये यांचे उपविभागीय कार्यलयात समायोजन करून सर्व कारभाराची सूत्रे उपविभागाच्या हवाली करण्यात येणार आहे. महावितरणच्या पुनर्रचनेत उपविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शाखा कार्यालयांचे सर्व कर्मचारी त्या-त्या उपविभागात समायोजीत होणार आहेत. वीज बिल दुरुस्ती, वीज तक्रारी, नवीन जोडण्या आदी सर्व कामे एकाच ठिकाणाहून एक खिडकी पद्धतीने मार्गी लावण्यात येण्याचे नियोजन आहे. ज्या वेळी हा प्रस्ताव व्यवस्थापनाने अंमलात आणण्याचे ठरविले, त्या वेळी सर्व कामगार संघटनांशी याबाबत बोलणी करून त्याला मूर्त रूप देण्याचे ठरविण्यात आले. प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या वेळी कामगार संघटनांनी या पुनर्रचनेत कर्मचाऱ्यांना घरी बसवून कामगार कपात करण्याचे व्यवस्थापनाचे मनसुबे असल्याचा आरोप केला. संघटनांकडून आंदोलनांचा पवित्रा घेतला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपाबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे.

महावितरणचे खासगीकरण करण्याचा शासनाचा डाव आहे. याबरोबरच कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. त्या विरोधात आम्ही संप पुकारला आहे. पिंपरी-चिंचवड मधील देखल कर्मचारी यामध्ये सहभागी होणार आहेत.
– ईश्‍वर वाबळे, पुणे परिमंडळ सचिव,
महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)