भारनियमन न करताही ग्राहकांना 24 हजार मेगावॉट वीज
नगर – यंदाच्या उन्हाळ्यात शनिवारी मुंबईसह राज्यात तब्बल 23 हजार 987 मेगावॉट विजेची मागणी होती. राज्यात कोणत्याही ठिकाणी भारनियमन न करता विजेची ही मागणी पूर्ण करण्यात आली असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.
राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात 23 एप्रिल रोजी मुंबई वगळून राज्यात महावितरणने 20 हजार 340 मेगावॉट विजेच्या उच्चांकी मागणीएवढाच यशस्वी पुरवठा केला होता. त्यानंतर शनिवारी राज्यातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात तब्बल 20 हजार 746 मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. 23 एप्रिलच्या तुलनेत सुमारे 400 मेगावॉटने विजेची मागणी वाढली, तरी महावितरणकडून विजेची उपलब्धता व तांत्रिक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून ही विक्रमी मागणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. मुंबईची मागणीसुद्धा तीन हजार 241 मेगावॉट नोंदविण्यात आली. राज्यात एकूण 23 हजार 987 मेगावॉट विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील विजेची उपलब्धता व तेवढाच पुरवठा याचा हा या वर्षीचा विक्रम आहे.
राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढत असतानाही यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत राज्याच्या कोणत्याही भागात वीजटंचाईमुळे भारनियमन करण्याची गरज उद्‌भवलेली नाही. तसेच सर्वाधिक विजेच्या मागणीएवढाच पुरवठा करणे महावितरणला शक्‍य झाले आहे. सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे सहा हजार 700 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्प तसेच दीर्घ व लघु मुदतीच्या कराराद्वारे सुमारे 10 हजार 200 मेगावॉट आणि इतर विविध स्त्रोतांकडून सुमारे तीन हजार 900 मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)