21 हजार 660 दाखलपूर्व : 2 हजार 950 प्रलंबित दाव्यांचा समावेश
पुणे – न्यायालयाची पायरी न चढताच जिल्ह्यातील 21 हजार 660 पक्षकारांना न्याय मिळाला आहे. त्या पक्षकारांचे दावे दाखल होण्यापूर्वीच रविवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये निकाली काढण्यात आले. तर प्रलंबित 2 हजार 950 खटले निकाली काढण्यात आले आहेत. दाखलपूर्व आणि प्रलंबित मिळून जिल्ह्यातील 24 हजार 610 दावे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पी.आर.अष्टुरकर यांनी दिली. या दाव्यामध्ये तब्बल 19 कोटी 93 लाख 22 हजार 416 रुपयांची तडजोड करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी जिल्ह्यातील न्यायालयात महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या महालोकअदालतमध्ये दाखलपूर्व दावे निकाली काढण्यावर भर देण्यात आला होता. 56 हजार 237 दाखलपूर्व दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 21 हजार 660 दाव्यांमध्ये तडजोड होऊन 7 कोटी 7 लाख 37 हजार 500 रुपयांची तडजोड करण्यात आली आहे. दाखलपूर्वमध्ये धनादेश बाऊन्स, बॅंक, वीज, पाणी बिलसंबंधी, वैवाहिक, तडजोड योग्य दिवाणी, फौजदारी दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. तर महालोकअदालतमध्ये 19 हजार 544 प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 950 दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये 12 कोटी 85 लाख 56 हजार 180 रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली आहे. धनादेश बाऊन्स, बॅंक, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, वीज, पाणी, वैवाहिक, जमिनीसंबंधी वाद, महसुल, विविध सेवा आणि तडजोड योग्य फौजदारी, दिवाणी स्वरूपाचे प्रलंबित दावे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा