महारेरातर्फे तक्रार निवारण मंचची स्थापना

  विकासक आणि ग्राहकांदरम्यान सुसंवाद वाढविण्यासाठी प्रयत्न होणार

पुणे-महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण अर्थात महारेराकडे दाखल होणाऱ्या ग्राहक आणि विकासक यांच्यातील तक्रारींची संख्या कमी व्हावी व त्या कायदेशीर प्रक्रियेत जाण्याआधी योग्य संवादाद्वारे त्यांचे निराकरण व्हावे या उद्देशाने राज्यात प्रथमच एका तक्रार निवारण मंचची स्थापना करण्यात आली आहे. येत्या 1 फेब्रुवारीपासून सदर मंचाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती आज पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

-Ads-

यावेळी कॉन्फिडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजीत नाईकनवरे, मुंबई ग्राहक पंचायतीचे पुण्यातील प्रतिनिधी शिरीष मुळेकर, विश्‍वस्त ललिता कुलकर्णी, महारेराचे तांत्रिक प्रमुख ज्ञानेश्वर हडदरे, केपीएमजी या संस्थेचे रोशन यादव यांबरोबर क्रेडाई आणि ग्राहक पंचायतीचे तक्रार निवारण मंचचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

सुहास मर्चंट म्हणाले की, बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असतात. हे वाद आता तक्रारींच्या स्वरूपात महारेराकडे निवारणासाठी जातात. मात्र, याआधी हे वाद सोडविण्याचा एक सकारात्मक प्रयत्न म्हणून या मंचची स्थापना होत आहे. महारेराकडे जाणाऱ्या तक्रारींची संख्या कमी व्हावी आणि बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांमध्ये सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असणार आहोत.

महारेराकडे रोज अनेक तक्रारी दाखल होत असतात. या तक्रारींची संख्या ही मोठी असून रेरा कायद्याच्या कलम 32 (जी) नुसार अशा स्वरूपाचा मंच किंवा व्यासपीठ असण्याची गरज सर्वच स्तरातून व्यक्त होत होती आणि या मागणीचा सकारात्मक विचार करीत महारेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी यांच्या पुढाकाराने वरील उपक्रम राबविण्यात येत आहे.
महारेराच्या माध्यमातून मुंबईत 10 तर पुण्यात 5 केंद्रे स्थापन करण्यात आली असून सुरुवातीला पुण्यातील केंद्रे औंध येथील महारेरा कार्यालय व कॅम्प परिसरातील क्रेडाई पुणे मेट्रोचे कार्यालय येथून कार्यरत असतील, अशी माहिती श्रीकांत परांजपे यांनी दिली.

क्रेडाई, पुणे तर्फे रोहित गेरा, अनिल फरांदे, मनीष जैन, अमर मांजरेकर, आय. पी. इनामदार हे सदस्य या मंचाचे सदस्य असतील तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागातर्फे ललिता कुलकर्णी, शिरीष मुळेकर, केशव बर्वे, तनुजा राहणे, कल्पिता रानडे आणि संजीव कुलकर्णी हे सदस्य असतील, असे शांतीलाल कटारिया यांनी जाहीर केले.
बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील वाद या दोघांच्या संमतीने वर नमूद तक्रार निवारण मंचाच्या माध्यमातून सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

परंतु यासाठी दोघांनीही या मंचासमोर येण्याची तयारी दर्शविणे आवश्‍यक आहे. यामुळे ग्राहक व बांधकाम व्यावसायिक यांमध्ये सुसंवाद तर वाढेलच याबरोबर महारेराकडे जाणाऱ्या तक्रारींच्या संख्येत लक्षणीय घट होईल अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक फोरममध्ये क्रेडाई पुणे व मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार असल्याची माहिती शिरीष मुळेकर यांनी दिली.

विशेष म्हणजे फक्‍त महारेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांसंदर्भातच तक्रारी सदर मंचअंतर्गत घेतल्या जाणार असून येत्या 1 फेब्रुवारीपासून महारेराच्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येणे शक्‍य होणार आहे. याशिवाय बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक दोघांच्या संमतीने या मंचपुढे सुनावणी होणार असून जर 45 दिवसांत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर तक्रारदाराला महारेरापुढे अपील करता येणे शक्‍य असल्याचा खुलासा यावेळी मर्चंट यांनी केला. मात्र, एक फेब्रुवारीपासून पुढील तक्रारीच या मंचसमोर येतील आणि ग्राहक पंचायतीमध्ये या आधी दाखल झालेली प्रकारने त्यांच्या परवानगीशिवाय तक्रार निवारण मंचकडे वळविता येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)