महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लब शासकीय योजनांपासून वंचित

वडगाव मावळ – जवळपास चार दशकांनंतरही महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लब शासकीय योजना आणि सुविधांपासून वंचित असल्याची खंत महाराष्ट्र गिरी भ्रमण संस्थेचे संस्थापक ऍड. रवींद्र यादव यांनी व्यक्‍त केली. क्‍लबने पॉवर लिफ्टिंगमध्ये अनेक खेळाडू तयार केले आहेत. महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लबची स्थापना 1979 साली झाली. महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लबच्या मावळातील खेळाडुंनी पॉवर लिफ्टिंग खेळात जागतीक स्तरावर नाव मिळवले आहे. 39 वर्षात 50 हून अधिक खेळाडुंनी जागतीक, आशियाई, आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरीय स्पर्धेत नावलौकिक मिळवला; पण शासकीय योजनाचा फायदा मिळाला नाही.

क्‍लबचा नावलौकीक
पॉवर लिफ्टिंगमध्ये मावळ तालुक्‍यातील पहिला आंतर राष्ट्रीय खेळाडू यतियाज अन्सारी, पाच वेळा राष्ट्रीय विजेता निलेश जोशी, नितीन म्हाळसकर यांने आशियाई स्पर्धेत ब्रॉझ पदक, जागतीक स्पर्धेत चौथा तसेच सलग 12 वर्ष राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व केले आहे. मनोज म्हाळसकर व प्रीती होले यांनी 2017 च्या जागतीक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले. 2017 च्या जागतीक आंतर विद्यापीठ स्पर्धेत शुभम तोडकर 10 व्या क्रमांकाने विजयी झाला. 50 हून अधिक खेळाडुंनी जागतीक, आशियाई, आंतर राष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरीय स्पर्धेत नावलौकिक मिळवला. पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लबने 12 वेळा राज्य स्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले. तसेच अपंग राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे देखील आयोजन केले. सह्याद्रि व हिमालय ट्रेकिंग मोहिमा, किल्ले संवर्धन कार्य तसेच मागील 13 वर्षांपासून श्रीमंत महादजी शिंदे उत्सव कार्यक्रम आयोजित केला जातो.

शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये दैनंदिन 75 ते 100 खेळाडू पॉवर लिफ्टिंग स्पर्धेची तयारी करतात. 39 वर्षांपासून महाराष्ट्र स्पोर्टस्‌ क्‍लब मावळ तालुक्‍यातील पॉवर लिफ्टिंगचे खेळाडू घडवण्याचे कार्य करत असून खेळाडूंना अद्यावत व्यायाम साहित्य काळाची गरज आहे. त्यातच काही खेळाडू अत्यंत गरीब असून त्यांना मदत आवश्‍यक असते. या खेळातून मावळ तालुक्‍याचे नाव जागतीक पातळीवर पोहचवण्याचे काम करणाऱ्या स्पोर्टस्‌ क्‍लबकडे आजतागायत कोणत्याही शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांने लक्ष दिले नाही. खेळाडुंनी उल्लेखनीय कामगिरी केल्यास त्या खेळाडुंचा सत्कार करण्यासाठी येणारे शासकीय अधिकारी व पदाधिकारी कोरड्या आश्वासनाची फुले उधळतात. स्पोर्टस्‌ क्‍लबला व्यायाम साहित्यासाठी आर्थिक निधी मिळाला नसल्याची खंत महाराष्ट्र गिरी भ्रमण संस्थेचे संस्थापक ऍड. रवींद्र यादव यांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)