महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बनली “मालामाल’

परीक्षा फी च्या माध्यमातून तब्बल 200 कोटींचा गल्ला जमा

– डॉ.राजू गुरव

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दरवर्षी विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा फी च्या माध्यमातून परिषदेकडे आत्तापर्यंत तब्बल 200 कोटी रुपयांचा गल्ला जमा झालेला आहे. यामुळे परिषद मालामाल झाली असून ही मोठी रक्कम बॅंकांमध्ये “फिक्‍स डिपॉझीट’ म्हणून ठेवण्यात आलेली आहे.

परीक्षा परिषदेकडून प्रामुख्याने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस), राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती (एनएमएमएस), शिक्षक पात्रता (टीईटी), शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, अध्यापक शिक्षण पदविका, विभागीय सेवा प्रवेशोत्तर, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र, बाह्य, टायपिंग या सारख्या बारा परीक्षा घेण्यात येतात.

परीक्षा परिषद ही 1996 मध्ये स्थापन करण्यात आली. गेल्या काही वर्षांपुर्वी ही स्वायत्त संस्था बनली आहे. या संस्थेची स्वत:च्या मालकीची एक एकर जागाही आहे. ही जागा विकत घेण्यासाठी सन 2010 मध्ये शासनाला 5 कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहेत. परिषदेत 13 पदसिध्द शासकीय सदस्य तर 9 नामनिर्देशित अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे सर्व अधिकार परिषदेकडेच कायम राहिलेले आहेत. कामकाज करताना मात्र शासनाच्या सर्वच नियमांची चोखपणे अंमलबजावणी करावीच लागते. वर्ग 1 व 2 मधील अधिकारी हे शासनाकडून नेमण्यात येतात. वर्ग 3 व 4 मधील सर्व कर्मचारी हे ठेकेदारी तत्वावर कार्यरत आहेत.

परीक्षांचे अर्ज ऑनलाईनच मागविण्यात येत असतात. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रही ऑनलाईनच उपलब्ध करुन देण्यात येतात. विविध परीक्षांसाठी 100 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंतची फी आकारली जाते. अर्जांसाठी नियमित, विलंब, अतिविलंब शुल्क याप्रमाणे फी वसूल करण्यात येते. दरवर्षी परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. या परीक्षा फी च्या माध्यमातून परिषदेकडे कोट्यवधी रुपये जमा झालेले आहेत. दरवर्षी या रकमेत सतत वाढच होत चाललेली आहे. जमा झालेली रक्कम जास्त असली तरी परीक्षांच्या विविध कामकाजासाठी तसा खर्चही जास्तीचाच करावा लागतो आहे. त्यातूनही खर्चात काटकसर केल्यामुळे मोठी रक्कम जमा झालेली आहे. ही रक्कम राष्ट्रीयकृत बॅंकामध्ये ठेवीच्या स्वरुपात ठेवण्यात आलेली आहे. ठेवीतून मिळणाऱ्या व्याजातूनच बराचशा कामांचा खर्च भागविण्यात येतो आहे, अशी माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

परिषदेकडे मोठी रक्कम जमा झाली असून आता परिषदेने स्वत:च्या मालकीची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. या इमारतीसाठी सुमारे 70 कोटी रुपये एवढा खर्च होण्याची शक्‍यता आहे. हा खर्च बॅंकांमधील ठेवीच्या रक्कमेतूनच करण्यात येणार आहे हे स्पष्टच आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)