महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नवी इमारत उभारणार

परिषदेच्या कामाचा वाढलाय व्याप : सल्लागाराच्या मानधनासाठी 2 कोटी

– डॉ. राजू गुरव

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची स्थापन होऊन 22 वर्षे झाली आहेत. दिवसेंदिवसे या परीक्षा परिषेदेचे कामकाज वाढत चालले आहे. त्यामुळे आता या परीक्षा परिषदेच्या कामकाजासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमण्यात येणार असून सल्लागाराच्या मानधनासाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी सन 1996मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली. सध्या या परिषदेमार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा (एनएमएमएस), राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (आरआयएमसी), शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी), अध्यापक शिक्षक पदविका परीक्षा (डी.टी.एड.) वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, संगणक टायपिंग परीक्षा, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, प्राथमिक शिक्षण सेवक निवड परीक्षा, सेवा प्रवेशोत्तर विभागीय परीक्षा, विविध बाह्य परीक्षा या सर्वच परीक्षांचे सर्व कामकाज राबविण्यात येते. या परीक्षांसाठी सध्या स्वतंत्र जूनी कार्यालये आहेत. आतापर्यंत सतत कार्यालयांचे डागडूजी करून कामकाज चालविण्यात आले. आता मात्र कामकाजाचा व्याप खूपच वाढत चालला असल्याने नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याची गरज भासू लागली आहे.

परीक्षा परिषदेच्या राज्य समितीने नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी 2 वर्षांपूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात मान्यतेनंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. यानंतर मार्च 2018मध्ये झालेल्या राज्य समितीच्या बैठकीत पुन्हा इमारत बांधकामाचा विषय मांडण्यात आला होता. या बैठकीत प्रत्यक्षात महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याने नवीन इमारत बांधण्याच्या कामाबाबत हालचाली वेग घेऊ लागला आहे. इमारत बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमण्यात येणार असून या सल्लागाराच्या मानधनासाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी “ई-निविदा’ प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याबाबतची निविदा 26 नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहे. सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच इमारतीचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था आहे. या परिषदेने सन 2010मध्ये राज्य शासनाकडून पुण्यात 5 कोटी रुपयांना 1 एकर जागा विकत घेतली होती. याच जागेवर अनेक वर्ष जूनी कार्यालये कार्यरत आहेत. आता याच जुन्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. ग्रीन बिल्डींगच्या धर्तीवरच ही नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असणार आहे. अद्ययावत कॉन्फरन्स हॉल, स्कॉंग रूम, वेटिंग रूम, गोडाऊन, गोपनीय साहित्यासाठी विशेष रूम, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे आदींची व्यवस्था नवीन इमारतीत करण्यात येणार आहे. आयुक्त, अध्यक्ष, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या अधिकाऱ्यांसाठी खास कार्यालये उभारण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठीही उत्तम व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र विभाग उभारण्यात येणार आहे. संपूर्ण इमारतीत सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची यंत्रणाही बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

परीक्षांच्या कामकामास गती मिळेल
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याच्या कामाबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्प सल्लागार व्यवस्थापकाची नेमणूक झाल्यानंतर प्रत्यक्षात बांधकामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम प्रकल्पास सुरूवात करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमुळे विविध परीक्षांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आणखी गती निश्‍चितच येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)