महाराष्ट्र बॅंकेच्या ग्राहकांना मनःस्ताप

– वडेश्‍वर शाखेत इंटरनेट बंद
– कामशेत शाखेतील वीज पुरवठा खंडीत

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील वडेश्वर व कामशेत येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील बीएसएनएल इंटरनेट मागील सात दिवसांपासून बंद असल्याने तसेच कामशेत शाखेतील वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. पर्याय म्हणून ग्राहक व्यवहारासाठी वडगाव मावळ शाखेत धाव घेत असल्याने येथे कामकाजाचा ताण वाढला आहे. महाराष्ट्रातील नामवंत बॅंकेच्या शाखांना घरघर लागल्याची चर्चा मावळात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मावळातील वाड्या-वस्त्यांवरील ग्राहक बॅंक ऑफ महाराष्ट्रशी जोडला गेला आहे. छोट्या-मोठ्या व्यवहारासाठी ग्राहकांची बॅंकेच्या विविध शाखांमध्ये गर्दी होत असते. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे त्यांना आवश्‍यक सोयी सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. वडेश्वर व कामशेत येथील बीएसएनएलची इंटरनेट सेवा 20 फेब्रुवारी 2019 पासून बंद आहे. बॅंकांचे सर्व कामकाज ऑनलाईन झाले आहे. अशा परिस्थितीत इंटरनेट बंद असल्याने सर्व कामकाजच ठप्प होत आहे. कामशेत शाखेची अवस्था अत्यंत भयाण झाली आहे. वीज बिल थकल्याने येथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे.

कामशेत व वडेश्वर शाखेतील गैरसोयीच्या कारभारामुळे आंदर मावळातील व नाणे मावळातील सुमारे 17 हजार 500 ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यातच वडगाव मावळ बॅंकेच्या कर्मचाऱ्यांवर या शाखेच्या ग्राहकांचा ताण येत आहे. ग्राहकांना बॅंकेतून पैसे काढणे व भरण्यासाठी मावळ तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ शाखेत आंदर मावळातील खांडी, सावळा, माळेगाव, कुसवली, नागाथली, इंगळून, भोयरे आदी गावातील ग्राहकांनी गर्दी करावी लागत आहे. त्यामुळे अगोदरच तालुक्‍याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली बॅंकेत तुफान गर्दी असते. पैसे भरणे व काढण्यासाठी तासन्‌तास रांगा लागत आहे. येथील एटीएममध्ये वारंवार खडखडाट असतो. त्यामुळे गैरसोईमध्ये भर पडत आहे.

बीएसएनएल तळेगाव दाभाडे मंडल अभियंता यांना वारंवार मोबाईलवर संपर्क केला असता, संपर्क झाला नाही. सायंकाळी 6 वाजेपर्यंत थांबूनही काही नागरिकांना वेळ संपल्याने रिकाम्या हाती जावे लागत आहे. कामशेत व वडेश्वर शाखेची बीएसएनएल इंटरनेट सेवा कधी सुरु होईल याची प्रतीक्षा करत आहेत. त्यातच कामशेत व वडेश्वर शाखेतील ज्येष्ठ नागरिकांची खूपच गैरसोय होत आहे. त्यांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी तिकीट, चहा, नाष्ट्याचा खर्च करुन तसेच वेळ घालवूनही गर्दीमुळे वडगाव मावळ शाखेत पैसे भेटतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आजार अंगावर काढत आहेत. बॅंकेचे कर्मचारी ग्राहकांना वडगावच्या शाखेत जाण्याचा सल्ला देत आहे. एकाच वेळी दोन शाखा बंद असल्याने नागरिकांची गैरसोय वाढत चालली आहे. बीएसएनएल इंटरनेट सेवा केवळ नावालाच असून पूर्ण क्षमतेने इंटरनेट सेवा देण्यास असक्षम ठरत आहे.

बॅंक ग्राहकांची गैरसोय कधी दूर होणार?
महाराष्ट्र बॅंकेचे वडगाव मावळ शाखा व्यवस्थापक मनोज भोंगाळे म्हणाले, बुधवार (दि. 20) पासून इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बॅंकेच्या ग्राहकांना वडगाव मावळ शाखेत यावे लागत आहे. बीएसएनएल इंटरनेट सेवेबाबत पाठपुरावा करत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कामशेत शाखा अभियंता विनोद राणे म्हणाले की, बॅंक ऑफ महाराष्ट्र कामशेत शाखेने वीज बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडीत केला आहे. वीज बिल भरल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत होईल. बीएसएनएल तळेगाव दाभाडे मंडल अभियंता यांना वारंवार मोबाईलवर संपर्क केला असता, संपर्क झाला नाही. अधिकारी आपली बाजू सावरत उत्तरे देत असले तरी ग्राहकांची गैरसोय कधी दूर होणार, याबाबत कोणीही बोलायला तयार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)