महाराष्ट्राला मिळणार 1 लाख 18 हजार व्हीव्हीपॅट मशीन

11 जिल्ह्यात 37 हजार मशीन्स रवाना
मुंबई – 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणूकीत ईव्हीएमच्या वापराला काही ठराविक राजकिय पक्षांनी विरोध केला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

आगामी निवडणूका पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी, याशिवाय कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले याची मतदारांना शहानिशा करता यावी यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1 लाख 18 हजार 500 व्हीव्हीपॅट मशीन मिळणार आहेत. यामुळे राजकिय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना पूर्णविराम मिळणार आहे.

2014 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन हॅक करून कुठल्याही चिन्हाचे बटन दाबले तरी ते ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते, असा आरोप करत राजकिय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. सत्ताधारी वगळता सर्वच विरोधी पक्षांकडून निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम यंत्राला आक्षेप घेत मतपत्रिकांचा वापर करण्याचा अट्टहास धरला आहे.

मतदान यंत्रावर आक्षेप घेणे एक प्रकारे निवडणूक आयोगावरच अविश्वास दाखविण्यासारखे सारखे आहे. त्यामुळे राजकिय पक्षांनी ईव्हीएमला कितीही विरोध केला असला तरी निवडणूक आयोगाने मात्र आगामी निवडणूका पारदर्शीप्रमाणे पार पडाव्यात यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास मिळाले आहे किंवा नाही याची खात्री करता यावी यासाठी ईव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. राज्यात एकूण 95 हजार मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राला 1 लाख 18 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे मिळणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 37 हजार 140 व्हीव्हीपॅट यंत्रे ताब्यात आली असून ती 11 जिल्ह्यांत रवाना करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांना ही यंत्रे मिळाली आहेत.

उर्वरित यंत्रे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिली. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणूकांमध्ये ईव्हीएम यंत्र वापरायची किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीतील 13 मतदारसंघात तसेच नुकत्याच झालेल्या पालघर, भंडारा लोकसभा पोटनिवडणूकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात आला होता. मात्र, यामधील काही यंत्रे बंद पडण्याच्या तक्रारी आल्या होत्या. परंतु, आगामी निवडणूकीमध्ये कोणत्या शंकेला वाव राहणार नाही यादृष्टीने नव्याने व्हीव्हीपॅट यंत्रे मागविण्यात आली आहेत.

ईव्हीएमला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार असल्याने प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. व्हीव्हीपॅट यंत्रामुळे मतदान केल्यानंतर अवघ्या सात सेकंदात कोणाला मतदान केले हे स्लिपद्वारे दिसेल. मात्र, ती स्लीप मतदारांन मिळणार नाही. या स्लीपचा वापर क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी होऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)