महाराष्ट्राला “मनरेगा’चे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

“जलयुक्त शिवार’ व “मागेल त्याला शेततळे’ योजनांचा सन्मान
नवी दिल्ली – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महाराष्ट्राला विविध श्रेणीत चार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध श्रेणीत एकूण 237 पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्राच्या रोजगार हमी विभागाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रोजगार हमी योजना आयुक्त ए.एस.आर. नाईक, रोहयो उपसचिव प्रमोद शिंदे व कमलकिशोर फुटाने यांनी स्वीकारला.

रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गीक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत एनआरएममध्ये एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत. यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झालेला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना व मागेल त्याला शेततळे या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचा सन्मान
गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोउत्कृष्ट कार्य करणारा जिल्हा ठरला आहे. रोजगार हमी आयुक्त तसेच गडचिरोली जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक, सध्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, उपायुक्त के.एन.राव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जयंत बहरे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघन यांनी पुरस्कार स्वीकारला. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली. यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्हयामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तीकामांवर भर देण्यात आले. जिल्हयात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार750 कामे पूर्ण झालेली आहेत.

नागरी ग्रामपंचायतीचा सन्मान
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातील नागरी ग्रामपंचायती ला गौरविण्यात आले. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतीने एनआरएमची विक्रमी 38 कामे पूर्ण केली. यामाध्यमातून गावात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.

नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार
ठाणे जिल्हयातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक नुतन प्रकाश यांनी 2016-17 मध्ये स्थानीक रोजगार हमी योजनेत काम करणा-या जवळपास 300 मजुरांना 7 लाख रूपयांचे वितरण केले. त्यांच्या या सेवेसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

पुण्यातील एमपीटीए संस्थेला तृतीय पुरस्कार
दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य आधारीत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे येथील एमपीटीए शिक्षण संस्थेला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे, सहायक उपाध्यक्ष अमोल वैद्य, संचालक प्रसाद कराडकर यांनी स्वीकारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)