21 पुरूष झाले महिला, तर 7 महिला झाल्या पुरूष
मुंबई – बीड जिल्ह्यातील माजलगावामधील महिला पोलीस शिपाई ललिता साळवे हिला लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी गृहविभागाने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात राज्यात आतापर्यंत 28 जणांनी लिंग परिवर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या लिंग परिवर्तनात 21 पुरूष हे महिला झाले आहेत, तर 7 महिलांनी पुरुष बनण्यासाठी शस्त्रक्रिया केली आहे.

लिंग परिवर्तनाबद्दल लोकं फारसे बोलत नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली असून या विषयीही लोक अधिकारवाणीने बोलू लागलेत. त्यामुळे लिंग परिवर्तनासाठी शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी लोकांचा पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यानुसार 2017-18 मध्ये राज्यात 28 जणांनी लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यात 28 जणांनी लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेतली आहे. यामध्ये 21 पुरुषांवर महिला होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर शरिरात पुरुषांचे हार्मोन्सचे प्रमाण जास्त असल्याने पुरुष बनण्यासाठी 7 महिलांनी लिंग परिवर्तनासाठी शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रियेनंतर दोन प्रकरणांमध्ये गंभीर स्थिती उद्भवली होती. मात्र उपचारांनंतर कोणतीही गुंतागुंत दिसून आली नसल्याचे माहिती अधिकारात दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

लिंग बदल शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी लोकांची संख्या वाढतेय. कारण स्त्री आणि पुरुष यांच्या लिंग परिवर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलायला लागला आहे, असे बॉम्बे रुग्णालयातील प्लॅस्टिक सर्जन डॉ. अशोक गुप्ता म्हणाले. या दोन्ही प्रकरणात पुरुषाला महिला बनवणे सोपे असते.

मात्र, महिलेला पुरुष बनवणे कठीण नसून अशक्‍यच असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. यामध्ये महिलांची गर्भाशयाची पिशवी काढून टाकावी लागते आणि पुरूषांच्या प्रजननाशी निगडित गोष्टी पाहाव्या लागतात. तसे झाले तरी भविष्यात त्या पुरुषाला मुले होतील किंवा नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे काही व्यक्ती मानसिक तणावाखालीही जाण्याची शक्‍यता असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)