महाराष्ट्रातील सागरी किनारे पर्यटन केंद्र म्हणून विकासित करणार

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांची माहिती 

नवी दिल्ली: महाराष्ट्राचा सागरी किनारा पर्यटनासाठी विशेष आकर्षण केंद्र म्हणून विकसित करणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे.अल्फोन्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात प्रभू यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. सागरी आरामदायी पर्यटन क्षेत्रातील क्रूझ शीप उद्योग, समुद्र किनाऱ्यालगतचे रिसॉर्ट, मरीन पार्कस्‌, स्कुबा डायव्हिंग आणि मत्स्यालय ही क्षेत्रे पर्यटन उद्योगातील वेगाने विकसित होणारा भाग आहेत असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. देशाला लाभलेल्या 7500 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्याच्या विकासाला मोठी संधी असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सेवा निर्यात प्रोत्साहन परिषद आणि मालवणच्या भारतीय स्कूबा डायव्हिंग आणि जलक्रीडा संस्थेकडून महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी एक सर्वंकष योजना मंत्रालयाला प्राप्त झाल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. या प्रस्तावात आंग्रीया तटावर स्कूबा डायव्हिंग आणि देशांतर्गत क्रूझ पर्यटन स्थळांचा विकास ,जागतिक दर्जाचे पाण्याखालील पर्यटन, सिंधुदूर्गमध्ये पाणबुडीतील पर्यटन तसेच जलचरांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठे मत्स्यालय उभारणे तसेच सागरी पर्यटन क्षेत्रात नवीन संकल्पना आणि कौशल्य विकासासाठी आयआयएसडीए संस्थेला अधिस्वीकृत संस्था म्हणून मजबूत करणे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सिंधुदूर्गमध्ये सागरी परिक्रमा क्षेत्र विकसित करण्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या पुढाकाराला हा प्रस्ताव पूरक ठरेल असे प्रभू यांनी म्हटले आहे. या कामासाठी 82 कोटी 17 लाख रुपयांची रक्कम याआधीच मंजूर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अल्फोन्स यांनी “चॅम्पियन सेक्‍टर इनिशिएटीव्ह’ च्या अंतर्गत लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी या प्रस्तावाचा विचार करावा अशी विनंती प्रभू यांनी केली आहे.

फेब्रुवारी 2018 मध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाने 12 चॅम्पियन सर्व्हिसेस सेक्‍टरवर लक्ष्य केंद्रीत करायचा निर्णय घेतला होता आणि यासाठी 5,000 कोटी रुपयांच्या निधी अंतर्गत विभागीय कृती योजना तयार करण्यासाठी विशिष्ट मंत्रालयं आणि विभाग निश्‍चित करणे अनिवार्य केले होते. पर्यटन आणि आदरातिथ्य चॅम्पियन सेवा क्षेत्रासाठी पर्यटन मंत्रालय “नोडल मंत्रालय’ म्हणून निश्‍चित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)