महाराष्ट्राच्या ‘या’ 3 रणरागिणींचा ‘वुमन ट्रान्सफॉर्मिंग’ पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील उस्मानाबादच्या कमल कुंभार, नागपूरच्या हरशिनी कन्हेकर आणि सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे यांना वुमन ट्रान्सफॉर्मिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार आणि निती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने येथील हॅबिटेट सेंटरच्या जॅक्‍यारंडा सभागृहात वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी, संयुक्त राष्ट्र संघाचे भारताचे प्रमुख युरी अफान्सिव, निती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर पुजा ठाकुर या उपस्थित होत्या.

यावेळी देशभरातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या 12 महिलांना पुरस्कृत करण्यात आले. यापैकी सर्वाधिक तीन महिला या महाराष्ट्राच्या आहेत. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र असे आहे. सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे या देशातील पहिल्या शेळ्यांच्या डॉक्‍टर आहेत. त्यांनी माणदेशी फाऊंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतले. त्यातून त्यांनी शेळी समुहाची सुरूवात केली, आज त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला शेळी डॉक्‍टर निर्माण झाल्या आहेत. सुरूवातीच्या काळात विरोध असणाऱ्या लोकांकडून आज सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्यांना केंद्रीय मंत्री इरानी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ग्रामीण महिला उद्योजिका कमल कुंभार या उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगलजवाडी येथील आहेत. यांनी 2000 रूपयांच्या गुंतवणुकीतून बांगड्याचा व्यवसाय सुरू केला होता. स्वयंम शिक्षण प्रयोग या गैरसरकारी संस्थेच्या संपर्कात येऊन त्यांनी उद्योगाशी संबंधित विविध प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणाचा लाभ इतर ग्रामीण महिलांनाही दिला. त्यांनी 4000 हजार ग्रामीण महिलांना उद्योजक बनविले आहे. त्या ऊर्जा सखी म्हणूनही कार्य करतात. त्यांचा या सर्वाथ कामाचा गौरव कार्यक्रमात करण्यात आला. विंग कमांडर पुजा ठाकूर यांच्या हस्ते कुंभार यांना पुरस्कृत करण्यात आले.

नागपूरच्या हरशिनी कन्हेकर या देशाच्या पहिल्या महिला फायर फायटर आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय फायर सर्विस कॉलेजच्या 46 वर्षाच्या इतिहासात त्यांनी प्रथम विद्यार्थिनी म्हणून प्रवेश घेतला होता. त्यांनी राष्ट्रीय फायर सर्विस कॉलेजचा इतिहास नव्याने लिहिलेला आहे. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या क्षेत्रातील करिअरमध्ये त्या ठामपणे काम करीत असल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. विंग कमांडर पुजा ठाकूर यांच्या हस्ते कन्हेकर यांना पुरस्कृत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)