महाराष्ट्राच्या मुलींची दणदणीत विजयाने सलामी

बारावी राष्ट्रीय सब-ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांचा पराभव 
भारतील रोलबॉल महासंघ आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांच्यातर्फे आयोजन 
पुणे- महाराष्ट्राच्या मुलींनी केरळवर एकतर्फी मात करताना बाराव्या राष्ट्रीय सब ज्युनिअर रोलबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुलांना मात्र गटातील पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. भारतीय रोलबॉल महासंघ आणि महाराष्ट्र रोलबॉल संघटना यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचा उद्‌घाटन समारंभ खासदार अनिल शिरोळे, वसंत राठी, आंतरराष्ट्रीय रोलबॉल फेडरेशनचे अध्यक्ष सूर्यकांत काकडे, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक महासंचालनालयाचे उपसंचालक नरेंद्र सोपल, अल्खुझरीर नासेर, अल्बौरई कासीम तालीब, भारतीय रोलबॉल महासंघाचे अध्यक्ष विनीत कुबेर, मोहिनी यादव यांच्या उपस्थितीत झाले.

महाराष्ट्राच्या मुलींनी केरळवर 9-1 ने विजय मिळवला. महाराष्ट्राकडून सानिया शेळके (3, 8 व 9वे मि.) आणि एच. राऊतने (11, 12 व 15वे मि.) हॅटट्रिक नोंदवली, तर तन्वीने (16 व 17वे मि.) दोन, तर सिद्धीने (13वे मि.) एक गोल केला. केरळकडून कृष्णा गोपीने (19 मि.) एकमेव गोल केला. इतर लढतींत उत्तर प्रदेश संघाने हिमाचल प्रदेश संघावर 14-1 असा दणदणीत विजय मिळवला. मध्यंतरालाच उत्तर प्रदेशच्या मुलींनी 9-0 अशी मोठी आघाडी घेतली होती. मध्य प्रदेश संघाने कर्नाटक संघावर 9-1ने मात केली.

स्पर्धेतील मुलांच्या गटात शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत हरयाणा संघाने महाराष्ट्राचे आव्हान 5-4 असे परतवून लावले. मध्यंतराला हरियाणा संघाकडे 3-1 अशी आघाडी होती. उत्तरार्धात महाराष्ट्राने जोरदार खेळ केला खरा, पण त्या संघाला हरयाणाचे आव्हान काही परतवून लावता आले नाही. हरयाणाकडून आर्यनसिंगने (9, 18 व 20वे मि.) तीन गोल केले, तर जी. आर्यनने (1 व 8वे मि.) दोन गोल करून त्याला चांगली साथ दिली. महाराष्ट्राकडून अमन राजानेही (7, 12, 19 मि.) हॅटट्रिक नोंदवली. पण, त्याला इतरांची फारशी साथ लाभली नाही. महाराष्ट्राकडून चौथा गोल यशराज पोरेने (11 मि.) केला.

इतर लढतींत गुजरातने जम्मू-काश्‍मीरवर 8-2ने विजय मिळवला. मध्यंतराला गुजरातकडे 3-1 अशी आघाडी होती. गुजरातकडून रुद्राने (4, 9, 17 व 20वे मि) हॅटट्रिकसह चार गोल नोंदविले, तर वत्सल (2 व 12वे मि.) आणि जेनिल (13 व 7वे मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. जम्मू-काश्‍मीरकडून अमिश (6वे मि.) आणि समर्थ गुप्ताने (18वे मि.) प्रत्येकी एक गोल केला. तेलंगणाने बिहारवर 10-0ने मात केली. मध्यंतराला तेलंगणाने 6-0 अशी आघाडी घेतली होती. कर्नाटक आणि पंजाब यांच्यातील लढत 4-4 अशी बरोबरीत सुटली. मध्य प्रदेशने ओडिशावर 11-3 असा मोठा विजय मिळवला. पॉंडिचेरीच्या मुलांनी आंध्र प्रदेश संघाला कुठलीही संधी न देता 5-0ने विजय मिळवला. यानंतर आंध्र प्रदेश संघाला दुसऱ्या लढतीतही पराभव पत्करावा लागला. या वेळी हिमाचल प्रदेशने त्यांच्यावर 9-0ने मात केली. केरळ संघाने चंदीगड संघाचे आव्हान 9-3 असे परतवून लावले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)