महाराष्ट्राच्या महिला संघाचा गुजरातवर एकतर्फी विजय

पुणे – फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या महिला संघाने गुजरातच्या महिला संघावर 31 धावांनी विजय मिळवताना बीसीसीआयच्या 23 वर्षांखालील महिलांच्या टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघाने निर्धारित 20 षटकांत 2 बाद 125 धावा केल्या. त्यानंतर गुजरात संघाचा डाव निर्धारित 20 षटकात 7 बाद 94 धावांवर रोखला गेला. विजयासाठी 126 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या गुजरात संघाने सावध सुरुवात केली. परंतु महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी त्यांच्या धावगतीला वेग येऊ दिला नाही.

त्यामुळे दबावात येत गुजरातच्या फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेल्या व त्यांना निर्धारित 20 षटकांत सात बाद 94 धावांचीच मजल मारता आली. गुजरातकडून एस. एस. पटेलने एकाकी लढत देत 31 चेंडूंत 2 चौकार आणि एका षटकारासह 36 धावा केल्या. महाराष्ट्राकडून त्रिशा हसबनीस व सोनावणे यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राच्या सलामीवीर मानसी मगरे आणि प्रियंका घोडके यांनी 7.5 षटकांत 45 धावांची भागीदारी केली. यावेळी हनी पटेलने ही भागीदारी तोडताना गुजरातला पहिला बळी मिळवून दिला.

प्रियंकाने 22 चेंडूंत 3चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. तर मानसी मगरेने 38 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 35 धावा फटकावल्या. महाराष्ट्राच्या दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर डी.पी.वैद्य आणि त्रिशा हसबनीसने संघाची आणखीन पडझड न होऊ देता महाराष्ट्राला 2 बाद 125 धावांपर्यंत मजल मारून दिली. वैद्यने 38 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावा केल्या तर त्रिशाने 22 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 23 धावा करताना तिला उत्कृष्ट साथ दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)