महाराष्ट्राचा कोळसा निवडणूक राज्यांना

भारनियमनावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

मुंबई – ऑक्‍टोबरमधील उष्म्याचा असह्य होत असताना अचानक उद्भवलेल्या वीज भारनियमनाच्या मुद्यावरून गुरूवारी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. भाजप सरकराने महाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा निवडणूक होत असलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांना दिल्याने महाराष्ट्राला वीजटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर राष्ट्रवादीचे आरोप निराधार असल्याचे सांगत भाजपने वीज पुरवठ्याच्या स्थितीबाबत खुल्या चर्चेला येण्याचे आव्हान दिले आहे.

-Ads-

विधानसभा निवडणूक जाहीर झालेल्या तीन राज्यांचे हित बघायचे आणि महाराष्ट्राला अडचणीत आणायचे हा भाजपचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला. राज्यात आजच्या घडीला अघोषित भारनियमन सुरू आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वीज पुरवठ्याशी संबंधित चारही कंपन्यांचे सल्लागार असलेले विश्वास पाठकर यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले असून दोघांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
राज्यातील औष्णिक वीज केंद्राना कोळशाचा पुरवठा होत नसल्याने सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवता येत नाहीत.

महाराष्ट्रातील वीज टंचाई राजकीयदृष्ट्‌या तयार करण्यात आली आहे. महिनाभरापूर्वी राजस्थानात जवळपास अडीच हजार मेगावॅट विजेचा तुटवडा होता. मात्र, निवडणुका असल्याने महाराष्ट्राचा कोळसा राजस्थानकडे वळविण्यात आला. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव असून त्याचा भुर्दंड महाराष्ट्राला सोसावा लागत असल्याचे मलिक म्हणाले.

विश्वास पाठक यांना महावितरण तसेच अन्य वीज कंपन्यांवर सल्लागार म्हणून नेमण्यात आले. मुळात पाठक हे एका वर्तमानपत्राचे सीईओ म्हणून कार्यरत होते. छापखान्यातील शाई, कागद यांची माहिती असलेल्या पाठक यांना वीज कंपन्यांचा सल्लागार म्हणून कसे काय नेमण्यात आले? असा सवाल मलिक यांनी केला.

आरोप निराधार : विश्वास पाठक
राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले आरोप निराधार असून राज्यातील ऊर्जा खात्याच्या कामगिरीबद्दल आणि वीज पुरवठ्याच्या स्थितीविषयी नवाब मलिक किंवा त्यांच्या पक्षाच्या माजी ऊर्जा मंत्र्यांनी खुल्या चर्चेला यावे. अशी चर्चा करण्यास मी तयार आहे, असे विश्वास पाठक यांनी सांगितले. आँक्‍टोबर हिटमुळे विजेची मागणी वाढली आहे. महावितरणने विविध उपाय केल्यामुळे सध्या केवळ 500 मेगावॅंट विजेचा तुटवडा आहे. त्यामुळे काही भागात तीन ते चार तास भारनियमन करावे लागत असल्याचे पाठक म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)