महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून 64 हजार दाखल्यांचे वितरण

– तहसिलदार उत्तम दिघे यांनी दिली माहिती

कोल्हापूर – ग्रामीण जनतेचे प्रश्न आणि समस्यांच्या सोडवणूकीसाठी महाराजस्व अभियान उपयुक्त ठरत असून करवीर तालुक्‍यात महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकारचे सुमारे 64 हजार दाखले देण्यात आले असून यापुढे हे अभियान अधिक गतीमान केले जाईल, अशी ग्वाही करवीरचे तहसिलदार उत्तम दिघे यांनी येथे दिली.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करवीर तालुक्‍यातील पाडळी खुर्द येथील श्रीराम कला क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्यावतीने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या संवादपर्व कार्यक्रमात तहसिलदार उत्तम दिघे बोलत होते. संवादपर्व कार्यक्रमास माहिती अधिकारी एस. आर. माने, माजी सरपंच शिताराम पाटील, मंडळाचे अध्यक्ष विक्रम पवार यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.

गावातील जनतेचे दैनंदिन स्वरुपाचे प्रश्न गावातच सुटावेत, लहान लहान प्रश्नासाठी लोकांना तालुका आणि जिल्हयाला जावे लागू नये, यासाठी शासनाने राज्य भर महाराजस्व अभियान सुरु करुन जनतेला दिलासा दिला असल्याचे सांगून तहसिलदार उत्तम दिघे म्हणाले, महाराजस्व अभियांनाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक पारदर्शी, लोकाभिमुख आणि गतीमान होत असून या अभियानांतर्गत सर्कल पातळीवर तसेच मोठमोठया गावामध्ये शिबिरांचे आयोजन करुन लोकांचे प्रश्न जागेवरच निकाली काढले जात आहेत. यामध्ये जनतेला लागणारे विविध प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्रे गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पानंद व शेत रस्ते मोकळे करणे, एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यासाठी फेरफार अदालत घेणे, या बरोबरच सर्व शासकीय विभागाकडील योजनांची प्रकरणे निकाली काढणे तसेच विविध शासकीय विभागाकडील विविध योजनांचे लाभार्थी या मेळाव्याच्या माध्यमातून निवडून त्यांनाही शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे.

महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून करवीर तालुक्‍यात 6 गावामध्ये गावनकाशाप्रमाणे अतिक्रमण बंद झालेले 1011 किलो मीटर लांबीचे पाणंद/शेतरस्ते मोकळे करुन देण्यात आले आहेत. या बरोबरच या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ आणि जागेवरच सुटत असल्याने या अभियानाचा लाभ तालुक्‍यातील जनतेने घ्यावा, असे आवाहनही तहसिलदार उत्तम दिघे यांनी केले. तालुक्‍यात ऑनलाईन सात बारा देण्याची प्रक्रिया गतीमान केली असून विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी शाळांमध्ये शिबिर घेण्याचे मोहिम राबविली जात असल्याचे ते म्हणाले. प्रारंभी माजी सरपंच शिताराम पाटील यांनी स्वागत केले. माहिती अधिकारी एस.आर.माने यांनी संवादपर्व कार्यक्रमाची संकल्पना विषद केली. शेवटी बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संजय पवार, तुकाराम पाटील, चंद्रकांत सुर्यवंशी अविनाश शिंदे, इंद्रजीत पवार, किशोर कांबळे, ओमकार पाटील, भरत पाटील, आबासो पाटील, महादेव जाधव आदीजण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)