डेक्कन आणि संभाजी उद्यान स्थानक पेठांना जोडणार
पुणे – वनाज ते धान्यगोदाम मेट्रोमार्गावर डेक्कन जिमखाना आणि संभाजी उद्यान मेट्रो स्थानके केबल स्ट्रेट ब्रिजद्वारे शहरातील पेठांना जोडली जाणार आहे. वर्तक उद्यानाची मागील बाजू आणि ओंकारेश्वर मंदिरामागील बाजूस हे दोन्ही पूल जोडले जाणार असल्याची माहिती या मार्गांचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी दिली.
महामेट्रोच्या या मार्गात सात स्थानके असून डेक्कन आणि संभाजी उद्यान या दोन्ही स्थानकांमध्ये सुमारे 700 मीटर अंतर आहे. ही दोन्ही स्थानके संभाजी उद्यानाच्या मागील बाजूने आहेत. त्यामुळे या स्थानकांवर पेठांमधील नागरिकांनाही सहज जाता यावे या उद्देशाने या दोन्ही स्थानकांवरून केबल ब्रीज उभारले जाणार आहेत, हे दोन्ही ब्रीज केवळ पादचाऱ्यांसाठी असणार आहेत.
या ब्रीजची एक बाजू मेट्रोच्या स्थानकावर असणार असून दुसऱ्या बाजूचा एकमेव पिलर हा नदीपात्राच्या बाहेर असणार असल्यामुळे नदीपात्राची कोणतीही हानी होणार नसल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले. हा ब्रीज सुमारे 200 ते 300 मीटर असणार असल्याचे ते म्हणाले.
फर्गसन रस्त्यापर्यंत पादचारी पूल
दरम्यान, डेक्कनच्या मेट्रो स्थानकाला जाण्यासाठी नदीपात्रापासून डेक्कनकडे जाताना जंगली महाराज रस्त्यावर डेक्कन बसस्थानकाच्या डाव्या बाजूला, तर जंगली महाराज रस्त्यावर महापालिकेच्या पार्किंगसमोरील बाजूपर्यंत पादचारी पूल उभारला जाणार आहे. या पूलाचा वापर करून फर्गसन रस्त्यावरील प्रवाशांनाही मेट्रोचा वापर करता यावा, उद्देशाने फर्गसन रस्ता ते जंगली महाराज रस्त्यापर्यंत आणखी एक पादचारी पूल उभारला जाणार असून त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे गाडगीळ यांनी स्पष्ट केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा