महामेट्रोमुळे पदपथ छोटे, टेन्शन मोठे!

पुणे – शहर “स्मार्ट’ करताना महापालिकेने नागरिकांना चालण्यासाठी रस्ते सुरक्षित व्हावे म्हणून रस्त्याची रुंदी कमी करून पदपथाची रुंदी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. तर दुसरीकडे “महामेट्रो’ने मात्र पदपथाची रुंदी कमी करण्याचे धोरण अवलंबले आहे. एवढेच नव्हे तर महामेट्रोकडून या पदपथावर अतिक्रमण करून नागरिकांना रस्त्यावरून चालण्याला भाग पाडले जात आहे.

“महामेट्रो’ कडून शहरात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. या मेट्रो कॉरिडॉर मध्ये कर्वेरस्ता, शिवाजीनगर, आरटीओ रस्ता परिसरात महामेट्रोकडून पदपथाची रुंदी कमी करण्यात आली असून, त्यावर बांधकाम साहित्य टाकून अडथळा निर्माण करण्यात आला आहे.

मेट्रोच्या कामामुळे एकीकडे पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे; तर दुसरीकडे मेट्रोच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचे पदपथावरून चालणे देखील कठीण झाले आहे. कर्वे रस्ता परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली आहेत. त्याचवेळी मेट्रो कडून पदपथावर काही ठिकाणी बॅरीकेडिंग टाकण्यात आले आहे तर मेट्रोचे बांधकाम साहित्य नित्यनियमाने पदपथावर टाकण्यात आले आहे. पौड रस्ता येथे तर “महामेट्रो’ ने आपले कार्यालयच पदपथावर थाटले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर वेगवान जाणाऱ्या वाहनांचा सामना करत रस्त्यावरून जीव धोक्‍यात घेऊन चालत जावे लागत आहे.

महामेट्रो आणि महापालिका संयुक्तरित्या नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मिळावेत यासाठी नियोजन करत आहे. ज्या ठिकाणी पदपथ नाही, त्याठिकाणी “महामेट्रो’ कडून पदपथाची निर्मिती करण्यात येत आहे. ज्याठिकाणी पदपथ फुटलेले आहेत त्यांची दुरुस्ती “महामेट्रो’ कडून करण्यात येत असल्याचे रिच 2 चे कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगतिले.

पोलिसांचे महामेट्रोला पत्र
कर्वे रस्ता आणि पौड रस्त्यावरील पदपथाच्या दुरवस्थे वरून या भागातील नागरिक तसेच लोक प्रतिनिधींनी वारंवार महामेट्रो तसेच पोलिसांकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्यानंतर महामेट्रो, वाहतूक पोलीस आणि पालिकेकडून वारंवार संयुक्त पाहणी करून पदपथ दुरुस्त करण्याचे आश्‍वासन दिले जाते. मात्र, त्यानंतर काहीच होत नाही. तसेच या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने पोलीसही त्रस्त झाले असून त्यांनी वाहतूक सुधारणेसाठी तातडीने आवश्‍यक ते खबरदारीचे उपाय करण्याच्या सूचना महामेट्रोला पत्राद्वारे केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)