महामार्ग ओलांडताना घडताहेत अपघात

कवठे येथील आशियाई महामार्गावरील नेहमीचे अपघात घडणारे ठिकाण (छाया : विनोद पोळ, कवठे.)

कवठे येथील परिस्थिती : दुभाजकांना संरक्षण रेलिंग बसविण्याची गरज
कवठे, दि. 4 (प्रतिनिधी) – कवठे, ता. वाई याठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग असतानाही ग्रामस्थ त्याचा वापर करत नाही. महामार्गावरुन ये-जा करत असल्याने याठिकाणी होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या कडेला तसेच दुभाजकाला रेलिंग बसवावेत जेणेकरुन ग्रामस्थांना भुयारी मार्गाचा वापर करणे अनिवार्य ठरेल आणि अपघातांच्या घटनांनाही आळा बसेल.
आशियाई महामार्गावरील कवठे, ता. वाई येथील बसथांबा असलेले ठिकाण हे मृत्यूचा सापळाच असल्यासारखे ठिकाण आहे. वारंवार येथे अपघात होत असून यामध्ये कित्येक लोक जायबंदी झालेले आहेत तर कित्येक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याच परिसरातून अनेक शालेय विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी महामार्ग ओलांडत असतात. तसेच कवठे हे गाव महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसले असल्याने व महामार्गावरून शेतीच्या व इतर कामासाठी ग्रामस्थांना वारंवार महामार्ग ओलांडावा लागत असल्याने गडबडीच्या वेळी भुयारी मार्गातून वळसा घालून जाण्यापेक्षा प्रवाशी महामार्गावरूनच रस्ता ओलांडतात. नुकताच या ठिकाणी महामार्ग ओलांडत असताना मारुती डेरे यांचा अपघाती मृत्यू झाला.
वेळेची बचत करण्यासाठी जीवाचे मोल द्यावयाची तयारी ठेवून समोर जीवघेणा धोका आहे हे माहित असूनसुद्धा कित्येक प्रवाशी वारंवार सूचना करूनसुद्धा या ठिकाणावरून महामार्ग ओलांडतात. या सर्व घटना टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी दुभाजकाच्या ठिकाणी रेलिंग लावण्याची आवश्‍यकता आहे. कालच्या घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कवठे ता. वाई येथे या परिसरातून तातडीने महामार्गावरील दुभाजकाच्या लेनमध्ये रेलिंग लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जेथे जेथे महामार्गाच्या दोन्ही बाजूस गाव आहे व ज्या ठिकाणावरून नेहमी प्रवाशी महामार्ग ओलांडतात त्या ठिकाणी दुभाजकामध्ये उंच रेलिंग लावल्यास प्रवाशाना अनिवार्यपणे भुयारी मार्गाचा वापर करुन महामार्ग ओलांडावा लागेल व ही सवय प्रवाशांना लागावी यासाठी महामार्ग प्राधिकरणाने जर दुभाजक उभारले तर भविष्यात होणाऱ्या महामार्ग पादचाऱ्यांच्या अपघातापासून सुटका होऊ शकते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)