महामार्गावर खुलेआम वेश्‍या व्यवसाय!

  • विद्यार्थीनी, महिलांना मन:स्ताप : पोलीस कारवाईचा बोजवारा

तळेगाव-दाभाडे, (वार्ताहर) – पुणे-मुंबई महामार्गावर येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाढवळ्या खुलेआम वेश्‍या व्यवसाय सुरू आहे. वाढत्या अवैध धंद्यावर पोलीस केवळ नावालाच कारवाई करीत असल्याचे दिसून येते. रस्त्यावरच्या वेश्‍या व्यवसायामुळे परिसरातील विद्यार्थीनी, महिला वर्गात नाराजी आहे. महामार्गावरील अवैध धंदे त्वरित बंद करून पोलीस गस्तीची मागणी विद्यार्थीनी व महिलांनी केली आहे.

तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरावडेश्‍वर डोंगर ते वडगाव-तळेगाव फाटा पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी वेश्‍या ये-जा करणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना “इशारे’ करतात. यामुळे वाहन चालकांचे लक्ष विचलीत होते. त्यामुळे वाहन थांबल्याने अपघाताची शक्‍यता वाढत आहे.

वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिला तोंडाला स्कॉर्प बांधून घोरावडेश्‍वर डोंगराच्या पायथ्याशी, सोमाटणे टोल नाका, सीआरपीएफ व वडगाव-तळेगाव फाटा चौक परिसरात उभ्या असतात. या परिसरात विद्यार्थीनी व महिला प्रवाशी वाहनांची प्रतीक्षा करत थांबलेल्या असतात. अचानक त्यांना बिनधास्तपणे वाहन चालक व नागरीक किती “रेट’ अशी विचारणा करतात. प्रसंगी महिलेला महामार्गावर थांबवून पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गेले असता त्या महिलेला विचारणा केली जाते. घडला प्रकार पतीस सांगितल्यास विचारणा केलेल्या पुरुषाला महिला, पती व नागरिकांकडून बेदम चोप दिला गेला, अशा अनेक घटना घडल्या आहेत.

या महिला महामार्गावर थांबून ग्राहक शोधतात. त्याला तळेगाव-दाभाडे परिसरातील लॉजमध्ये नेतात. महामार्गावरुन सतत पोलीस अधिकाऱ्यांची वाहने ये-जा करतात. त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. मार्च महिना तीव्र उन्हाचा असल्याने विद्यार्थीनी व महिला तोंडाला स्कॉर्प बांधत असल्याने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यामुळे महामार्गालगत विद्यार्थीनी, महिलांना थांबणेही अवघड झाले आहे.

काही वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिला ग्राहकांशी अश्‍लील चाळे करून त्यांच्यावर पोलीस केस करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचे प्रकार वाढत आहेत.

दिवसाढवळ्या सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायामुळे विद्यार्थीनी व महिलांना महामार्गावरुन ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. पोलिसांत तक्रार केल्यास त्या विद्यार्थीनी व महिलांविरुद्ध विचारणा होते.
या वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पोलिसांचे भय उरले नसून त्यांची हिंमत अधिक वाढली आहे. महामार्गावरील वेश्‍या व्यवसाय त्वरित बंद करून अनधिकृतपणे लॉजवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थीनी व महिलांनी केली आहे.

स्थानिक पोलीस निरीक्षकांनी ठरवल्यास कोणताही अवैध धंदा चालणार नाही. वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांवर येथे कारवाई केली की त्या लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हद्दीत जातात. अवैध धंद्यांना बळ देणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ज्या परिसरात वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिला थांबतात, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असून दामिनी पथकांची गस्त सुरू करणार आहे.
– गणपत माडगूळकर
उप विभागीय पोलीस अधिकारी, देहुरोड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
3 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)