महाभारत 2019 चे

     नीती अनीती

 स्थान- स्वर्गलोक; वेळ- चिंतन करण्याची

वातावरण गंभीर! कौरव व पांडव दोन्ही पक्ष एकमेकांना न्याहाळत बसलेत. डोक्‍यात विचारांचे थैमान, हे असे कसे घडते आहे, तेही एवढ्या वर्षांनी? महाभारत युद्ध संपून इतकी वर्षे झाली; पण असा बाका प्रसंग कधी आला नाही. आपल्या नावाचा वापर उघड उघड असा कसा होऊ शकतो? पृथ्वीतलावरील क्षुल्लक राजकारणात आपला वापर टाळायचा असल्यास नेमके काय करावे या चिंतेत दोन्ही पार्टी आपापले स्थान ग्रहण करून आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकवार भगवान श्रीकृष्णास पाचारण करण्याचे ठरले व तसा निरोप धाडण्यात आला. भगवान ही तडकाफडकी पोहोचले व अचंबित होऊन दोन्ही पक्षांकडे कटाक्ष टाकला. भगवंतांचे स्वागत करण्यासाठी अर्जुन व दुर्योधन लगबगीने पुढे आले व आदराने आसनावर बसवले.

“स्वागत आहे. भगवान. आपण आलात व मनावरील दडपण कमी झाले, प्रणाम करतो.’ “प्रिय वत्सा, अर्जुना! तुम्ही माझी आठवण काढलीत हे माझे भाग्य! महाभारत युद्ध झाले. मी गीता सांगितली अन सारे मला विसरले.’ ‘भगवान, तदनंतर काही प्रॉब्लेम नाही आला तर कशाला बोलावू?’ दुर्योधन सवयीप्रमाणे मध्येच बोलतो. अर्जुन पुढे होतो व निवेदन देण्यास सुरुवात करतो. ‘भगवान, दिल्ली येथे कॉंग्रेस पक्षाचे अधिवेशन होते. त्यात भाषणात उल्लेख करताना नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी आमचा व कौरवांचा उद्धार केला. नाव वापरले, आणि संतापजनक म्हणजे पांडवांची तुलना कॉंग्रेसशी केली हो. भगवान, द्युतात धर्मराजांनी सारे काही गमावल्यावरसुद्धा एवढे वाईट वाटले नाही आम्हा पांडवांना.’ अर्जुनाची अवस्था बघून दुर्योधन पुन्हा एकवार हसायला लागतो व भगवंताला सांगण्याचा प्रयत्न करतो, ‘…आणि भगवान, आमचा पण उल्लेख करायची गरजच काय? तेही उपहासाने व स्वार्थासाठी? युद्धनीती न पाळणारी ही पिढी, आपली बरोबरी करणार?’ दुर्योधनाचे हे बोल ऐकून अर्जुन व भीम कुत्सितपणे हसतात.

‘मधुसुदना, वनवासात बारा वर्ष आनंदाने अनेक घाव सोसले. पण हा घाव भरेल की नाही?’ सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून भगवान श्रीकृष्ण मंदपणे हसतात ‘भ्रातांनो, तुमची पीडा मला कळते हो. त्यांचा स्तर काय, आपली लेवल काय होती हे मला का कळतं नाही? परंतु हे जे काही मृत्युलोकात चालले आहे हे थांबवणे आपल्या अवाक्‍याबाहेरचे आहे. निवडणुका या धर्मयुद्धच आहेत व ते महाभारत युद्धापेक्षा भयंकर आहे. तुम्ही गीतोपदेश ऐकून घेतला पण हे सारे ऐकण्याच्या पलीकडले आहेत अर्जुना. वत्सा अर्जुना, सध्या एकच उपदेश पृथ्वीतलावर सुरू आहे. दर पंधरा दिवसांनी ‘मन की बात’ हा कार्यक्रम असतो, जो सारे मनोभावे ऐकतात, मी गीता सांगत असताना तू ऐकलीस तसे. त्यात त्यांनी आपली बाजू मांडली तरच काही चमत्कार घडेल, अन्यथा भगवान भरोसे.अरे आपले महाभारत फार लहान होते. हे महायुद्ध असते, एकवार दोघेही बघा. एन्जॉय …..!’ एवढे बोलून भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावतात.

– धनंजय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)