महाबळेश्‍वरपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीची चलती

रंग, आकार, चवीच्या बाबतीत ठरतेय सरस : भावही अधिक

पुणे – स्ट्रॉबेरी म्हटल्यावर आठवतो महाबळेश्‍वर आणि वाईचा परिसर. मात्र, सध्या महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीला भोरच्या स्ट्रॉबरीशी स्पर्धा करावी लागत आहे. रंग, आकार आणि चवीच्या बाबतीत भोरची स्ट्रॉबेरी सरस ठरत असल्याने महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीला अधिक भाव मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज 10 ते 12 टन स्ट्रॉबेरीची आवक होत आहे. घाऊक बाजारात महाबळेश्‍वरच्या दोन किलोच्या स्ट्रॉबेरी बॉक्‍सला 80 ते 130 रुपये, तर भोरच्या स्ट्रॉबेरीला 120 ते 180 रुपये भाव मिळत आहे. तसेच भोरच्या जम्बो स्ट्रॉबेरीला प्रतिकिलोला 140 ते 150 रुपये भाव मिळत आहे. स्ट्रॉबेरीसाठी वातावरण चांगले असल्याने भोरची स्ट्रॉबेरी आकाराने मोठी आहे. फळधारणा अधिक असल्याने आवकही अधिक होत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

बाजारात दाखल होत असलेल्या स्ट्रॉबेरीला राज्यभरातून मागणी होत आहे. महाबळेश्‍वर येथील चांगला माल विशेषत: परराज्यात पाठविला जात आहे. दुय्यम दर्जाचा माल स्थानिक बाजारपेठेत पाठविला जात आहे. त्यामुळे फळबाजारात महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीला अधिक मागणी होत आहे. राज्यासह गुजरात, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतूनही स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सद्य:स्थितीत तरी स्ट्रॉबेरीसाठी हवामान पोषक असल्याने मार्चपर्यंत हंगाम सुरू राहील.

मागील वर्षी स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी हवामान पोषक नव्हते. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला नव्हता. परिणामी घाऊक बाजारात दोन किलोला 80 ते 120 रुपये भाव मिळत होता. तसेच फळ धारणेअभावी हंगामही लवकर संपला होता. त्या तुलनेत यंदा हवामान चांगले आहे. फळ धारणा अधिक आहे. तसेच मालाचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांकडून मागणी अधिक आहे. हंगामही अधिक काळ चालणार असल्याचा अंदाजही मोरे यांनी व्यक्त केला.

प्रायोगिक तत्त्वावर आम्ही गावातील चार ते पाच शेतकऱ्यांनी मिळून स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. सहा गुंठ्यात 3,200 रोप लावले होते. हवामान चांगले असल्याने सद्य:स्थितीत दिवसाआड 25 ते 30 किलो स्ट्रॉबेरी निघत आहे. संपूर्ण हंगामात सुमारे 6 ते 7 टन स्ट्रॉबेरी निघेल. या आधी आम्ही भात शेती करीत होतो. मात्र, त्या शेतीला अधिक मेहनत करावी लागते. त्या तुलनेत स्ट्रॉबरीच्या शेतीला मेहनत कमी लागते. बाजारात मिळणारा भावही चांगला आहे.

– संतोष देशमुख, शेतकरी, पसुरे, ता. भोर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)