महाबळेश्‍वरच्या पायाभूत सुविधांवर 

क्षमतेपेक्षा जास्त पर्यटकांचा ताण 

सातारा – महाराष्ट्राचे नंदनवन समजले गेलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वरच्या पायाभूत सुविधांवर क्षमतेपेक्षा चाळीस टक्के जास्त पर्यटकांचा ताण पडत आहे. हा धक्कादायक निष्कर्ष केंद्र सरकारने महाबळेश्‍वरसाठी नेमलेल्या उच्चस्तरिय समितीने काढला आहे. महाबळेश्‍वर शहराची वहन क्षमता पूर्णपणे संपली असून इको सेंसेटिव्ह झोन असणाऱ्या या शहराच्या पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे स्पष्ट मत समितीच्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे चेरापुंजी समजले जाणाऱ्या महाबळेश्‍वरमध्ये सरासरी साडेचार हजार मिलिमीटर पाऊस पडतो. जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या पश्‍चिम घाटाचा मध्यबिंदू असणारा महाबळेश्‍वर तालुका 2001 मध्ये इको सेंसेटिव्ह झोन जाहीर झाला आहे. मात्र गेल्या सतरा वर्षात पर्यटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे या पर्यटन स्थळाची वहन क्षमता शून्यावर आली आहे.

प्राप्त नोंदीनुसार वहन क्षमतेपेक्षा चाळीस टक्के जास्त पर्यटक या पर्यटनस्थळावर येतात. महाबळेश्‍वर शहराची लोकसंख्या फक्त तेरा हजार, तालुक्‍याची लोकसंख्या पंचावन्न हजार या तुलनेत या गिरिस्थानाला दरवर्षी 18 लाख पर्यटक भेट देतात. म्हणजे एकूण क्षमतेच्या त्रेसष्ट पट भार हा महाबळेश्‍वरच्या पायाभूत सुविधासह पर्यावरणावर पडत आहे. महाबळेश्‍वर व पाचगणी येथील सांडपाण्यावर होणाऱ्या प्रक्रियेचे शास्त्रीय परिक्षण होणे गरजेचे आहे. मात्र अपुरी यंत्रणा आणि पर्यावरण संवर्धनाच्या अविकसित जाणीवा, बेकायदा उत्खननं आणि बांधकामे या कचाट्यात महाबळेश्‍वरच्या पर्यावरणाची संवेदनशीलता हरवत चालली आहे.

राज्य निसर्ग पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील लिमये म्हणाले, महाबळेश्‍वर शहराच्या पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना विश्‍वासात घेउन संयुक्‍त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या. पर्यटकांकडून येणाऱ्या शुल्कातून स्थानिकांना रोजगार मिळाला. मात्र, शहराची वहन क्षमता वेळीच ओळखून बेसुमार पर्यटनाला वेळीच पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय समितीने पर्यावरण ऱ्हासाचा हा धोका ओळखून तत्काळ पावले उचलायला सुरवात केली आहे.

प्रत्येक महिन्याला शिवार फेरी, जेणेकरून अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्याकरिता महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कार्यशाळा, जीआयएस द्वारे जमिनीचे मॅपिंग इ. उपाययोजना सुरू असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले. महाबळेश्‍वरमध्ये जैवविविधता व काही वारसा स्थळे असल्याने हा भाग विलक्षण संवेदनशील आहे. तरीही येथे झपाट्याने अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. याबाबत कोर्टाच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे बाब गंभीर असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी नमूद केले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)