महाबळेश्‍वरचा पाणी पुरवठा बंद करणार

प्राधिकरणाचा इशारा : सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा फटका नागरिकांना

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वर पालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे पालिकेने जीवन प्राधिकरणाची 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम थकविली आहे. ही रक्कम 15 फेब्रुवारीपर्यंत प्राधिकरणाकडे जमा केली नाही तर पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा प्राधिकरणाने पालिकेला दिला आहे. सत्ताधारी गटाच्या मनमानी कारभाराचा फटका आता महाबळेश्‍वरकरांना बसण्याचा धोका निर्माण झाला असून कारभाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाबळेश्‍वर शहरास पाणी पुरवठा करणारी योजना काही वर्षांपुर्वी जीवन प्राधिकरणाकडे होती. ती हस्तांतर करून पालिकेकडे सोपवण्यात आली. योजनेसाठी पालिका प्राधिकरणाकडुन कच्चे पाणी विकत घेवून त्यावर शुध्दकरण प्रक्रिया करून ते शहरात पुरविले जात होते. ही योजना पालिकेकडे आल्यापासून तोट्यात सुरू आहे. प्राधिकरणाकडून ज्या रक्कमेने पाणी खरेदी केले जाते त्यापेक्षा कमी दराने ते शहरवासियांना पुरविले जाते. योजना प्राधिकरणाकडे होती तेव्हा वाणिज्य नळ कनेक्‍शनची संख्या अधिक होती. परंतु गेल्या चार वर्षात अनेक नागरिकांनी वाणिज्य वापराची नळ कनेक्‍शन पालिकेत वशिला लावून घरगुती करून घेतली. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न घटले.

आज केवळ 69 नळ कनेक्‍शन वाणिज्य आहेत तर 1770 कनेक्‍शन घरगुती आहेत. प्राधिकरणाकडून येणारे पाणी बील व शहरातून होणारी वसुली यामध्ये मोठी तफावत आहे. थकबाकी दरमहा वाढत वाढत गेली. आज ही थकबाकी 6 कोटी 30 लाख 2 हजार 209 आणि त्यावरील विलंब आकार 3 कोटी 73 लाख 97 हजार 507 अशी एकूण थकबाकीची रक्कम 10 कोटी 3 लाख 19 हजार 717 रूपये इतकी झाली आहे. थकबाकीसाठी प्राधिकरण पालिकेत खेटे घालत असते. परंतु पालिकेचे मुख्याधिकारी व कारभारी दुर्लक्ष कर होते. प्राधिकरणाने अखेर नोटीस देवून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. 15 तारखेपर्यंत थकबाकी भरली नाही तर कोणतीही सुचना न देता पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे.

पालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी सत्तेवर आहे. दोन वर्षे आघाडीतील कारभारी काय करीत होते असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. स्वच्छता अभियानासाठी पालिकेने स्वनिधीतून पाच कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केली. यंदाही तेवढ्याच खर्चाचा अंदाज आहे. हीच रक्कम जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतर केली असती तर अशी वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

मंत्रिमहोदयांशी बैठक लावण्याचे प्रयत्न

या विषयावर तोडगा काढण्यासाठी पालिकेने मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. भाजपाच्या नगरसेवक रविंद्र कुंभारदरे यांच्या मध्यस्थीने राज्य शासनाच्या मंत्री महोदयांबरोबर बैठक लावण्याचे प्रयत्न सुरू असून त्या बैठकीत विलंब आकार माफ करण्याची मागणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)