महाबळेश्वर सैल यांना “सरस्वती’ने सन्मानित

नवी दिल्ली – कोकणी साहित्यातील अतुलनीय योगदानासाठी साहित्यिक महाबळेश्वर सैल यांना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते आज साहित्यातील मानाच्या “सरस्वती’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

जनपथ मार्गावरील राष्ट्रीय संग्रहालयात के. के. बिरला फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरीत करण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्ष शोभना भारतीय, सरस्वती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष न्या. आदर्श सेन आनंद, फाउंडेशनचे संचालक डॉ. सुरेश ऋतुपर्ण यावेळी मंचावर उपस्थित होते.

के.के. बिरला फाउंडेशनच्या वतीने राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचित समाविष्ट भारतीय भाषांतील उत्तम साहित्यकृतीसाठी वर्ष 1991 पासून “सरस्वती’ पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कोकणी साहित्यिक महाबळेश्वर सैल यांच्या “हावठण’ या कांदबरीची वर्ष 2016च्या सरस्वती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. शाल, प्रशस्तीपत्र, प्रतिक चिन्ह आणि 15 लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कर्नाटकातील कारवार जिल्हयातील माजळी या गावी सैल यांचा जन्म झाला. सैल यांचे कोकणीसहित मराठी भाषेतही मोलाचे योगदान आहे. मराठी भाषेत त्यांची चार नाटके आणि एक कादंबरी प्रसिध्द आहे. सैल यांच्या “युगसांवर’ या कोकणी कादंबरीचे “तांडव’ या शिर्षकाने मराठीत रूपांतर झाले. मराठीतील श्रेष्ठ कादंबऱ्यांमध्ये तिची गणना होते.

1991 मध्ये पहिला “सरस्वती’ पुरस्कार हिंदी साहित्यातील योगदानासाठी डॉ. हरिवंशराय बच्चन यांना प्रदान करण्यात आला. मराठी साहित्यातील योगदानासाठी दिवंगत साहित्यिक विजय तेंडुलकर (1993) यांना, तर प्रसिध्द नाटककार महेश एलकुंचवार (2002) यांना प्रदान करण्यात आला आहे. आज 26 वा सरस्वती सम्मान महाबळेश्वर सैल यांना प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)