महाबळेश्वर आगार समस्यांच्या गर्तेत

एके काळी राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असणारे महाबळेश्वर आगार अधिकाऱ्यांच्या उदासिन भूमिकेमुळे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. आगाराचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळित झाले असून आगाराची कोणतीच गाडी नियमितपणे धावत नाही. डोंगराळ विभागातील प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्‍याला महाबळेश्वर आगाराच्या अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे हरताळ फासला जात आहे. नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांनी आगाराच्या बेशिस्त कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून कामकाजात सुधारणा न झाल्यास गणेशोत्सवात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा महाबळेश्वर तालुक्‍यातील प्रवाशांनी, स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे.

महाबळेश्वर हा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ तालुका आहे. महाबळेश्वर हे तालुक्‍याचे मुख्य ठिकाण आहे. दळणवळणासाठी , बाजारहाटासाठी, शैक्षणिक तसेच शासकीय कामांसाठी तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेला महाबळेश्वरला रोज येणे-जाणे असते. ग्रामीण भागातून महाबळेश्वरला येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला एसटी हेच एकमेव माध्यम आहे. सकाळी गावातून सुटणाऱ्या पहिल्या गाडीने महाबळेश्वरला येवून दिवसभर कामे करून संध्याकाळी मुक्कामाच्या गाडीने घरी परत जायचे असा दैनंदिन दिनक्रम येथील नागरिकांचा असतो. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून महाबळेश्वर आगाराच्या बेजबाबदार व बेफिकीर कारभारामुळे सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार व शालेय विद्यार्थ्यांना रोजच त्रास सहन करावा लागतो आहे. तासन तास बसस्थानकावर गाडीची वाट पहावी लागत असल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या तर रोजच नादुरुस्त होत आहेत.

ग्रामीण भागात दुधगाव, खरोशी, वाळणे, हातलोट, येरणे, तापोळा, गोगवे, कळमगाव, आखेगणी या गावांकडे जाणाऱ्या गावांकडे जाणाऱ्या फेऱ्या अनियमित असून आगाराच्या बिघडलेल्या या वेळापत्रकामुळे रोज ग्रामीण भागात जाणाऱ्या फेऱ्या रद्द होणे, सुमारे दोन ते तीन तास उशीरा धावणे हे प्रकार प्रवाशांच्या माथी मारले जात आहेत. आगाराच्या गाड्या वेळेवर सुटत नसल्याने सगळ्यात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत असून गाडी वेळेवर न आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्याऐवजी आगार व्यवस्थापक मात्र विभागीय कायार्लयाकडून स्पेअर पार्ट येत नसल्याने अडचणी येत असल्याचे सांगत आहेत. सध्याच्या घडीला महाबळेश्वर आगारात रोज पाच ते सहा गाड्या स्पेअर पार्ट वाचून एका जागेवर उभ्या आहेत.

चार ते पाच वर्षांत आगाराला एकही नवीन गाडी विभागीय कार्यालयाने दिलेली नाही. येथे राज्यातून तसेच परराज्यातूनही पयर्टकांची नेहमी वर्दळ व गर्दी असते. मात्र या प्रवाशांना समाधानकारक सेवा द्यायला महाबळेश्वर आगार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे पयर्टकांमधूनही बोलले जात आहे. पुणे, मुंबई, ठाणे, बोरिवली, नाशिक, बारामती या हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या फेऱ्या ही अनियमितपणे धावत असल्याने प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कायम उत्पन्न मिळवून देणाऱ्या वाई शटल तसेच मेढा मार्गे सातारा जाणाऱ्या फेऱ्या ही अनियमित असून या मार्गावर एसटीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. मात्र वाई शटलला जाणाऱ्या गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून वाई शटलची गाडी कुठे बंद पडेल याचा नेम नाही.

तसेच मेढा मार्गे सातारा जाणाऱ्या गाड्यांच्या बाबतीतही आगाराचा अनुभव चांगला नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. मेढा-सातारा जाणारी एकही फेरी वेळेत सुटत नसल्याने खासगी वडाप वाहतूक चांगलीच फोफावली आहे. हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत आगाराची उदासिन भूमिका दिसून येत आहे. आगारात एकही स्थानिक कामगार नाही. त्यातच प्रतिकूल परिस्थिथीवर मात करून येथील कामगार उत्पन्नवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असताना देथील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या उदासिन भूमिकेमुळे आगाराच्या गाड्या ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले असून आगारात काम करणे अवघड झाल्याने अनेक कामगारांनी इतर आगारात बदलीसाठी प्रयत्नही सुरू केल्याचे समजते.

उत्पन्नवाढीसाठी व प्रवाशांना वेळेत बससेवा पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांनी आळस झटकून सकारात्मक दृष्टिकोन दाखवून व विभागीय कार्यालयाने देखील महाबळेश्वर आगाराला सापत्नभावाची वागणूक न देता आगारास गतवैभव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेवून प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी अपेक्षा महाबळेश्वर तालुक्‍यातील सामान्य प्रवाशी, शालेय विद्यार्थी, शासकीय चाकरमान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कोट: आगार व्यवस्थापक एन.पी.पतंगे यांची प्रतिक्रिया – येथील वाहने जुनी झाली आहेत त्यामुळे त्यांचे स्पेअर पार्ट मिळत नसल्याने नाईलाजास्तव गाड्या बंद ठेवाव्या लागतात. कमी गाड्यांमध्ये नियोजन करताना अनेक अडचणी येतात तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाड्या बंद ठेवाव्या लागत आहेत. नविन गाड्यांची मागणी करुन देखील मिळत नसल्याने जुन्या गाड्या चालवाव्या लागत आहेत व त्या वाटेत बंद पडत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)