महापौर निवडणुकीत मनसे भाजपसोबत

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना, अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळाल्या. यामध्ये महापौरपदी संधी न मिळाल्याने भाजपचेच तीन नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर शिवसेना तटस्थ राहिली, मात्र मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजप उमेदवाराला मतदान केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे 77 नगरसेवक असल्याने, भाजपचा महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे स्पष्ट होते. मात्र. तरी देखील राष्ट्रवादीने ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्यासाठी दोन्ही पदांकरिता उमेदवार दिले होते. ही उमेदवार कायम ठेवल्याने, या दोन्ही पद निवडीकरिता महापालिका सभागृहात मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये नगरसेवकाने स्वत:चे नाव, प्रभागाचे नाव व मतदान करण्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निवडणूक प्रक्रियेत 128 पैकी 120 नगरसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये शिवसेना तटस्थ राहिल्याने गटनेते राहुल कलाटे, अमित गावडे, निलेश बारणे, अश्‍विनी वाघमारे, कमल यादव, दर्शले रेखा आणि अश्‍विनी चिंचवडे या सात सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला नाही. याशिवाय शिवसेनेचे प्रमोद कुटे आणि सचिन भोसले सभागृहात उपस्थित नव्हते. तसेच राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी, राजू बनसोडे आणि सुलक्षणा शिलवंत-धर हे नगरसेवक वैयक्तिक कारणास्तव या निवडणुकीसाठी अनुपस्थित राहिले.

या कारणामुळे मनसेचा पाठिंबा
दरम्यान, मनसेचे एकमेव नगरसेवक आणि गटनेते सचिन चिखले यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत राहुल जाधव यांना मतदान केले. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिले. गेल्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच मनसेकडून निवडून आलेल्या राहुल जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले होते. याशिवाय गेल्या निवडणुकीत मनसेचे तीन आणि भाजपचे चार अशा एकूण सात नगरसेवकांचा गट असताना देखील माझ्या भुमिकेमुळे राहुल जाधव यांना स्थायी सदस्यपद मिळू शकले नाही. ही परतफेड करण्यासाठी भाजपच्या राहुल जाधव यांना पाठिंबा दिल्याचे पत्र चिखले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

माझा कोणालाही त्रास होणार नाही!
37 वर्षीय राहुल जाधव दहावी उत्तीर्ण असून काही काळ त्यांनी रिक्षा चालकाचाही व्यवसाय केला आहे. आमदार महेश लांडगे यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. मागील पंचवार्षिक निवडणूक त्यांनी मनसेकडून लढवली होती. मात्र, आमदार लांडगे यांच्या समवेत ते भाजपमध्ये डेरेदाखल झाले. पत्रकारांशी बोलताना नवर्निवाचित महापौर राहुल जाधव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर देशभरात कष्टकऱ्यांची नगरी म्हणून परिचित आहे. मी स्वत: रिक्षा चालक होतो. त्यामुळे कष्टकऱ्यांच्या हाल-अपेष्टा मला माहित आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करताना तळागाळातील नागरिकांपर्यंत महापालिकेच्या योजना पोहोचविण्याचे काम करणार आहे. आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत ज्यांनी सहकार्य केले त्यांना सलाम करतो. माझ्यापासून कोणालाही त्रास होणार नाही, असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)