महापौर दिवसभर पालिकेत आलेच नाहीत

वाहनात बिघाड : कार्यशाळा विभागाने केला हलगर्जीपणा

पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेच्या कामकाजासाठी महापौरांच्या वापरात असलेल्या पालिकेच्या दोन वाहनांचा तांत्रिक विघाड झाल्याने वाहन दुरूस्ती करण्यासंदर्भात स्वतः महापौर नितीन काळजे यांनी कार्यशाळा विभागाला कळविले असताना या विभागाने महापौरांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. अखेर आज गाडी बंद पडल्याने महापौरांना खासगी वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. यामुळे ते पालिकेत दिवसभर येऊ शकले नाहीत. कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांना मात्र दिवसभर मनस्ताप सहन करावा लागला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महापौर पदी नितीन काळजे यांना संधी मिळाली. नागरिकांच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांना कार्यक्रम, समारंभ तसेच महापालिकेच्या कामकाजानिमित्त बाहेर जाण्यासाठी पालिकेची दोन वाहने वापरात आहेत. दोन्ही वाहनांचे एमएच 14, सीएल 0707 आणि एमएच 14, एई 0007 असे क्रमांक आहेत. सोमवारी (दि. 19) एका वाहनाचा तांत्रिक बिघाड झाला. हे माहित असताना देखील महापौर नितीन काळजे हे दिघी येथील रामचंद्र गायकवाड महाविद्यालयात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी नादुरूस्त वाहनातून गेले होते. परंतु, त्यांचे वाहन रस्त्यातच बंद पडल्यामुळे कार्यक्रम आटोपून त्यांना पालिकेत येता आले नाही, असे महापौर काळजे यांनी प्रशासनाला कळविले आहे.

दोन्ही वाहनांत तांत्रिक बिघाड झाला असून लवकरात लवकर दुरूस्ती करण्याच्या सूचना महापौर काळजे यांनी महापालिकेतील कार्यशाळा विभागाला अधीच दिल्या होत्या. मात्र, या विभागाकडून त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली. महापौर दिवसभर पालिकेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेक नागरीक कामानिमित्त महापौरांच्या दालनासमोर महापौर आता येतील, मग येतील म्हणून दिवसभर वाट पाहून सायंकाळी आपापल्या घरी निघून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)