महापौरांचा अधिकाऱ्यांना दणका

पिंपरी- महापौर राहुल जाधव यांचे महापालिका अधिकाऱ्यांशी पटेनासे झाले आहे. शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना कामासाठी मुदतवाढ देऊनही त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. तर शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा शासकीय सेवेत पाठविण्याची उपसूचना मंजूर केली असून, त्याची कार्यवाही सुरू आहे.

आयुक्तांच्या खालोखाल शहर अभियंता हे महत्त्वाचे पदनाम पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर आहे. दीड वर्षांपूर्वी अंबादास चव्हाण यांच्याकडे प्रभारी शहर अभियंतापदाचा पदभार सोपविण्यात आला होता. एक वर्षाच्या प्रभारी पदभारादरम्यान, समाधानकारक कामानंतर प्रशासनाने त्यांची शहर अभियंता पदावरील नियुक्ती कायम केली आहे.
दरम्यान, राहुल जाधव हे महापौर झाल्यानंतर त्यांनी शहरातील आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटविण्याच्या महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या. तसेच आरक्षित जागांना संरक्षक भिंत घालण्यासाठी पुढाकार घेतला होता. याबाबत 24 ऑगस्टला महापौर दालनात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या आरक्षित जागांना संरक्षण भिंत अथवा तारेचे कुंपन घालण्याच्या सूचना शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना दिल्या होत्या. एका महिन्यानंतरही महापौरांच्या सूचनांना चव्हाण यांनी केराची टोपली दाखविली. मात्र, चव्हाण यांच्यावर कामाचा ताण असल्याने महापौर जाधव यांनी त्यांना याच कामाकरिता एका महिन्याची मुदतवाढ दिली. मात्र, या कामाच्या प्रगतीबाबत विचारणा केली असता, अद्यापही कार्यवाही शून्य असल्याचे समजल्यानंतर महापौरांचा पारा चढला. त्यांनी अंबादास चव्हाण यांनी शहराच्या प्रथम नागरिकाने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही, ही गंभीर बाब आहे. याची खातरजमा करून, चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करुन, त्यांच्यावर कठोर करवाई करण्याची मागणी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

काही महिन्यांपूर्वी महापालिका शिक्षण समितीमध्ये प्रशासन अधिकारीपदी नियुक्त झालेल्या ज्योत्स्ना शिंदे यांनी 5 सप्टेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या शिक्षक दिनाचे नियोजन न केल्याने, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठविली होती. त्यामुळे भाजपची मोठी मानहानी झाली होती. त्यानंतर आयोजित केलेल्या आदर्श शाळा व गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देखील दांडी मारली. त्यातच महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसरल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापौर जाधव यांनी शहरातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी देखील केली. या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादात शिक्षणाचा घसरणारा दर्जा प्रकर्षाने दिसून आला. तत्पूर्वीच शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना शासन सेवेत परत पाठविण्याची उपसूचना देखील महासभेत मंजूर करत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

शहराच्या विविध भागांमधील महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण झाले असून, त्यावर अनेक नागरिक बेकायदेशीरपणे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे या जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेणे अवघड झाले आहे. शहराचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपले योगदान देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांवर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये शहर अभियंता अंबादास चव्हाण आणि शिक्षण समितीच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचा समावेश आहे.

-प्रतिनियुक्‍तीवर शहर अभियंत्यासाठी प्रयत्न
काह महिन्यांतच शहर अभियंता अंबादास चव्हाण सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, चव्हाण याचा प्रशासकीय कामातील वेळकाढुपणा लक्षात घेता, चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीनंतर महापालिका आस्थापनेवरील एखाद्या अधिकाऱ्याला शहर अभियंतापदी नियुक्ती देणे धाडसाचे ठरू शकते. त्यामुळे शहर अभियंतापदी राज्य सरकारच्या सेवेतील अभियंता नियुक्तीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सुतोवाच केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)