महापुरुष आणि आपण… 

सागर ननावरे 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती देशभरात साजरी केली गेली. जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार अशा अनेक पदव्यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले जातात. जगाच्या नकाशावर आपल्या भारतभूमीचे नाव अभिमानाने घ्यावयास लावणाऱ्या महापुरुषांपैकी एक म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

-Ads-

मला आठवत लहानपणी आम्ही शाळेत असताना महापुरुषांच्या जयान्तीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जायचे. त्यात आमची भाषणे व्हायची. महात्मा गांधींच्या जयंतीला ‘अहिंसा’ या विषयावर भर असायचा. लोकमान्य टिळकांच्या जयंतीला “मी शेंगा खाल्ल्या नाहीत म्हणून मी टरफले उचलणार नाही” ची गोष्ट आवर्जून सांगितली जायची. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असायची तेव्हा भाषणात “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.” हे धारदार वाक्‍य ओठांवाटे अगदी उत्स्फूर्तपणे बाहेर पडायचे. शालेय जीवनात जयंतीपुरती तोंडपाठ असणारी वाक्‍ये सहसा अर्थासहित मनावर तेवढी कोरली जायची नाहीत. परंतु शिक्षण संपून जेव्हा वास्तविक जीवनात व्यावहारिक ज्ञानाची गरज पडायची, तेव्हा मात्र या वाक्‍याची ताकद लक्षात यायची.

शिक्षण ही काळाची गरज आहे हे फार पूर्वीच फुले-शाहू-आंबेडकरांनी जाणले होते. आणि म्हणूनच त्यांनी तत्कालीन विरोधाला न जुमानता शिक्षणगंगा अविरत चालण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आणि त्यांच्या या प्रयत्नातूनच शिक्षण क्षेत्राला आज सुगीचे दिवस आले आहेत. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्‍कांची जाणीव होते. तसेच शिक्षणामुळेच माणसाचे राहणीमान उंचावते आणि त्यातूनच तो स्वतःचा उद्धार करू शकतो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ठाम मत होते. जगातील सर्वांत प्रदीर्घ लोकशाही असणाऱ्या राष्ट्राची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अस्तित्वात आणली.

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बाबासाहेबांना विशेष आदर होता. एकदा कोणीतरी बाबासाहेबांना प्रश्‍न केला की, एवढी मोठी राज्यघटना लिहिणे तुम्हाला कसे काय शक्‍य झाले?
त्यावर तितक्‍याच तत्परतेने उत्तर देताना बाबासाहेब उद्‌गारले, छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते. आणि त्यामुळे मला राज्यघटना लिहिताना अधिक कष्ट घ्यावे लागले नाहीत.

त्यांच्या या वाक्‍यातून त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल असणारे प्रेम व्यक्त होते. आज आपण म्हणतो ‘राजे तुम्ही पुन्हा जन्माला या’ परंतु यापेक्षा त्यांनी दिलेल्या मार्गावर जाऊन काहीतरी भव्यदिव्य करावे असे आपणाला का वाटत नाही? खरंतर ज्यांना महाराज कळाले त्यांनी खूप काही असाध्य ते साध्य केले. आणि यापैकीच एक म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कारण त्यांनी शिवचरित्राचा आदर्श घेऊन एक भक्‍कम राज्यघटना बनविली. काही वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र जाधव यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांतील काही साम्ये सांगितली होती. त्यातील एक म्हणजे दोघांनीही सामान्य माणसांना जवळ केले आणि सामान्य माणसांमधून असामान्य शक्‍ती निर्माण केली. दुसरे म्हणजे दोघांनीही सरंजामशाहीला-वतनदारीला विरोध केला.

महाराजांनी राजकीय वतनदारीला विरोध केला तर बाबासाहेबांनी सामाजिक वतनदारीला विरोध केला. तसेच तिसरे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दोघांनीही समाजामध्ये स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविले, उदासीन समाजात नवचैतन्य भरले. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. त्यानंतर काल तितक्‍याच उत्साहात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही साजरी केली. आज त्यांच्यानंतर अनेक वर्षे उलटली. परंतु त्यांनी ज्या एकीसाठी आणि जनतेच्या भल्यासाठी आयुष्य वेचले त्याचे आपण पालन करतो का? त्यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती होईल असे काही करतो का?

काहीअंशी हे प्रत्यक्षात अंमलात आणले जात असले तरी बऱ्याच अंशी आजही समाज केवळ त्यांचे गुणगान गाण्यात आणि त्यांच्या नावाचे भांडवल करण्यातच मग्न आहे हे या मातीचे दुर्दैव म्हणावे लागेल. मित्रानो असा उज्वल वारसा लाभलेल्या महापुरुषांच्या मातीत आपण जन्माला आलो हे आपले भाग्यच आहे. म्हणूनच आता हीच वेळ आहे असे काहीतरी करून दाखविण्याची की जेणेकरून त्यातून या मातीचे आणि इथल्या लोकांचे नाव जगभरात आदराने आणि अभिमानाने घेतले जाईल. आणि असे केल्यास हेच या महापुरुषांच्या स्मृतीस खरे अभिवादन ठरेल.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)