महापालिकेसाठी भाजपची पाच जणांची कोअर समिती

पक्षांतर्गत समन्वयासह समिती घेणार पक्षप्रवेशाचा निर्णय
नगर – शहर भाजपमधील गटातटाचे राजकारण संपुष्ठात आणण्यासाठी तसेच महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी पाच जणांची कोअर समिती स्थापन केली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, माजी शहर जिल्हाध्यक्ष ऍड. अभय आगरकर व शहर सरचिटणीस किशोर बोरा यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
शहर भाजपमध्ये खा. गांधी व ऍड. आगरकर यांच्यातील शह, कटशहाच्या राजकारणामुळे पक्ष संघटना वाढीला मर्यादा येत आहे. महापालिका निवडणुकीत या दोघांच्या गटातटांच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांची विभागणी होत आहे. महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी हे दोन्ही गट एकत्र येणे आवश्‍यक आहे. यासंर्दभात पहिली बैठक मुंबईला खा. दानवे यांच्या उपस्थित झाली होती. त्या वेळी या दोघांना एकत्रित काम करण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु या बैठकीनंतरही खा. गांधी व ऍड. आगरकर एकत्र आले नाहीत. खा. गांधी यांनी आपली एकाधिकारशाही सुरू ठेवली होती. विशेष म्हणजे अन्य पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह महत्वाच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रवेश परस्पर खा. गांधी यांच्याकडून करून घेण्यात येत होता. या प्रक्रियेत ऍड. आगरकर गटाला विश्‍वास घेण्यात आले नाही. त्यामुळे ऍड. आगरकर हे दूर राहत होते. खा. दानवे यांच्या आदेशानंतरही खा. गांधी व ऍड. आगरकर यांच्यात मनोमिलन झाले नाही; उलट पुन्हा जिरवाजिरवीचे राजकारण रंगले होते. पक्ष संघटना बांधणीस दोघांतील गटातटाचे राजकारण अडचणीचे ठरत होते. त्यामुळे आज पुन्हा खा. दानवे यांनी नगर दौऱ्यात खा. गांधी व ऍड. आगरकर यांना एकत्रित काम करण्याचे आदेश दिले. या दोघांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालकमंत्री प्रा. शिंदे व जिल्हाध्यक्ष बेरड यांच्यावर टाकण्यात आली. मुंबईत झालेल्या बैठकीत शिंदे, गांधी, व आगरकर या तिघांची समिती स्थापन करण्यात आली होती; पण आजच्या बैठकीत खा. दानवे यांनी बेरड व बोरा या दोघांचा समितीमध्ये समावेश करून पाच जणांची समिती केली आहे. या समितीच्या माध्यमातून पक्षांतर्गत समन्वय ठेवण्यात येणार असून अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ही समिती महत्वपूर्ण राहणार असली, तरी उमेदवार निश्‍चितीचे अधिकारी मात्र अद्याप या समितीला देण्यात आलेले नाहीत. पक्षासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महापालिका निवडणुकीतील प्रभागनिहाय सर्व्हे सुरू केला आहे. या सर्व्हेचा अहवाल आल्यानंतर उमेदवार निश्‍चित केले जाणार आहेत. खा. गांधी यांनीदेखील स्वतंत्र सर्व्हेसाठी वापरलेल्या यंत्रणेचा विचार केला जाईल; परंतु तो सर्व्हे पक्ष पूर्णपणे स्वीकारेल असे नाही, असे खा. दानवे यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)