महापालिकेवर साडेतीन कोटी निधी परत करण्याची नामुष्की

वेळत निधी खर्च झाला नाही
मुलभूतचा एक कोटी निधीचा समावेश
नगर- निधी नाही म्हणून ओरड करणाऱ्या महापालिकेचा तब्बल साडेतीन कोटी अखर्चित निधी परत गेला आहेत. त्यात सीनानदी सुशोभिकरणासह मुलभूत सुविधा या लेखाशिर्षाखाली उपलब्ध झालेल्या निधीचा समावेश आहे. जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध झालेला निधी वेळत खर्च न झाल्याने निधी परत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती अतियश नाजूक असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार देखील वेळत करणे जिकिरीचे झाले असतांना विकास कामे करणे तर अवघड आहे. अशा परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीसह शासनाच्या विविध योजनांमधून विकास कामांसाठी उपलब्ध झालेला निधी वेळेत खर्च न झाल्याने तो अखर्चित राहिला.परिणामी तो परत पाठविण्याची वेळ महापालिकेवर आली. अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांकडून निधी वेळ खर्च करण्याबाबत कोणताही पाठपुरावा होत नसल्याचे हे कारण आहे. विकास कामांसाठी निधी नाही म्हणून नगरसेवक ओरड करतात. पण आहे तो निधी देखील खर्च होत नाही ही दुसरी बाजूही या निमित्ताने समोर आली आहे.
सीना नदी सुशोभिकरण एक कोटी 4 लाख तर मुलभूत सुविधाचा एक कोटी निधी परत गेला आहे, असा दोन कोटी 4 लाख निधीसह नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधारणा निधी अन्य शासकीय योजनांचा तब्बल दीड कोटी निधी परत पाठवावा लागला आहे. विकास कामांसाठी जागा न मिळणे, निविदा प्रक्रिया वेळत न राबविणे आदी कारणामुळे निधी परत गेल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात या विकास कामांचा आढावा पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधीच न घेतल्याने आज हा निधी परत गेला आहे. निधी खर्च करण्यास महापालिकेला दोन वर्ष असतांनाही या दोन वर्षात निधी खर्च होवू शकला नाही.

निधी परत जाण्यास जे अधिकारी जबाबदार आहे, त्यांच्यावर आयुक्‍तांनी जबाबदारी निश्‍चित करावी. महापालिकेच्या विकासाला निधी एक तर उपलब्ध होत नाही. तो झाला तर वेळेत खर्च करण्याची अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. बांधकाम विभाग अशा पद्धतीने काम करून अखर्चित निधी ठेवणार असेल तर त्यांच्या कारवाई झाली पाहिजे.
– बाळासाहेब बोराटे
विरोधी पक्ष नेते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)