महापालिकेलाच नकोय महसूल वाढ

अधिकाऱ्याची नेमणूक, पण कर्मचारी देण्याचा विसर

पुणे – सेवा नियमावलीनुसार महसूल आणि खर्चाची बाजू सांभाळण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दोन्ही स्वतंत्र विभाग केले आहेत. त्यातील महसूल विभागाची जबाबदारी उपायुक्त तुषार दौंडकर, तर खर्चाची जबाबदारी मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्याकडे आहे. याचे आदेश आयुक्तांनी दि.28 ऑगस्ट रोजी काढले. याला दोन महिने झाले, तरी महसूल विभागासाठी एकही कर्मचारी दिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या विभागासाठी सामान्य प्रशासन विभागाने 31 जणांची निवड केली आहे. मात्र, त्यांची नियुक्तीच न झाल्याने हा विभाग दोन महिन्यांपासून कागदावरच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेतील सुधारित सेवा नियमावलीत पालिकेच्या अंदाजपत्रकासाठी महसूल आणि खर्च अशा स्वतंत्र बाबींसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही पदांची जबाबदारी महापालिकेतील मुख्य लेखापाल उल्का कळसकर यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे खर्चाची जबाबदारी ठेऊन उत्पन्नाची जबाबदारी आयुक्तांनी दौंडकर यांच्याकडे सोपविली आहे. ज्या दिवशी दौंडकर यांना हा पदभार देण्यात आला, त्यावेळी या विभागासाठी स्वतंत्रपणे 31 कर्मचारीही निश्‍चित करण्यात आले. मात्र, अजून या कर्मचाऱ्यांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. तसेच या विभागासाठी जागाही निश्‍चित केलेली नाही. त्यामुळे उपायुक्त दौंडकर वगळता महापालिकेच्या महसूल विभागात एकही कर्मचारी नसल्याचे पालिकेच्या समान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमुळे समोर आले आहे.

उत्पन्नासाठी केला विभाग
गेल्या काही वर्षांत महापालिकेचे महसूली उत्पन्न घटत असून पाणीपुरवठा, मिळकतकर, पथारी शुल्क, तसेच इतर काही विभागांची थकबाकी दरवर्षी वाढतच आहे. त्या वसुलीसह रखडलेली शासकीय अनुदाने तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याची जबाबदारी या महसूल विभागावर असल्याने याचे काम तातडीने सुरू झाल्यास पालिकेच्या महसुलात वाढ होईल, यासाठी या विभागाची स्थापना दोन महिन्यांपूर्वी करण्यात आली. मात्र, हा विभाग अजूनही सुरूच झाला नसल्याने महापालिकेलाच उत्पन्नात वाढ नको काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)